नवी मुंबईतील खारघर येथे आयोजित आप्पासाहेब धर्माधिकारी महाराष्ट्र भूषण सन्मान सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आलेल्या सुमारे १० जणांना उष्माघात आणि चेंगराचेंगरीमुळे जीव गमवावा लागला आहे. तसेच १५ जण गंभीर असून त्यांना आयसीयूत भरती करण्यात आले आहे. यापैकी काहींना खारघर सेंट्रल पार्कजवळील टाटा हॉस्पिटलमध्ये, तर काहींना पनवेल परिसरातील वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे आप्पा साहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषणने सन्मानित करण्यासाठी खारघर येथील सेंट्रल पार्क येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळातील सर्व सदस्य सहभागी झाले होते.
कार्यक्रमादरम्यान, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक नेत्यांनी व्यासपीठावरून उष्णतेचा उल्लेख केला होता, तरीही लोकांना उष्णतेपासून दिलासा देण्यासाठी कोणतीही पावले उचलली गेली नाहीत. तापमान ४२ अंशांच्या आसपास होते ज्याचा उल्लेख खुद्द अमित शहा यांनी आपल्या भाषणामध्ये केला होता. लाखोंच्या जमावामुळे वातावरणातील आर्द्रता आणखी वाढली होती. त्यातच कार्यक्रम संपताच चेंगराचेंगरी देखील झाली.
हे ही वाचा:
अमेरिका ठरला भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश
दहशतीचा, अत्याचारांचा अध्याय संपुष्टात आला!
रत्नागिरी बस स्थानक प्रवाशांच्या सेवेसाठी की त्रासासाठी…
आता रेल्वे फाटक ओलांडण्याची गरज नाही; १०० उड्डाणपूल बांधले जाणार
जवळपास १५ ते २० लाख लोक या कार्यक्रमासाठी आले होते. गेल्या दोन दिवसांपासून धर्माधिकारी यांच्या महाराष्ट्र भूषण सन्मानासाठी लोक खारघर येथे येऊ लागले होते. या कार्यक्रमासाठी भलेमोठे मैदान लोकांनी खच्चून भरले होते. त्याबाहेरही लोक गोळा झाले होते. रणरणत्या उन्हात लोकांनी हा कार्यक्रम पाहिला.