इराण-अफगाणिस्तानमार्गे आलेलं ८७९ कोटी रुपयांचं हेरॉईन जप्त

इराण-अफगाणिस्तानमार्गे आलेलं ८७९ कोटी रुपयांचं हेरॉईन जप्त

रायगड जिल्ह्यातल्या उरण तालुक्यातील जेएनपीटी बंदरातून आयात करण्यात आलेल्या कंटेनरमध्ये सुमारे ८७९ कोटी रुपयांचं हेरॉईन जप्त करण्यात आलं आहे. डीआरआयने केलेल्या कारवाईमध्ये इराणमार्गे आलेल्या कंटेनरमधून या हेरॉईनची तस्करी करण्यात आल्याचं उघड झालं आहे.

मुंबईजवळच्या जेएनपीटी बंदरातून आयात-निर्यातीचा व्यवसाय हा मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. त्यातच शुक्रवारी करण्यात आलेल्या कारवाईमध्ये अफगाणिस्तानहून इराणमार्गे जेएनपीटी बंदरात आलेल्या कंटेनरची तपासणी करण्यात आली. डीआरआयमार्फत या संशयित कंटेनरची तपासणी केली असता त्यामध्ये तुरटी आणि तोंडाला लावण्याची पावडर असे सामान असल्याचे नमूद करण्यात आले होते. परंतु, डीआरआयला मिळालेल्या माहितीनुसार या सामानाची तपासणी केली असता यामध्ये ड्रग्ज असल्याचा संशय आला होता.

यामुळे, एनडीपीएस किटच्या मदतीने या मालाची तपासणी केली असता त्यामध्ये हेरॉईन असल्याची खात्री झाली. यामुळे या कंटेनरमधील मालाची तपासणी केली असता त्यामध्ये सुमारे २९३ किलो हेरॉईन असल्याचे आढळून आले असून या संपूर्ण मालाची किंमत ही सुमारे ८७९ कोटी रुपये असण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यासंदर्भात, या कंटेनरचा आयातदार याला देखील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. तर डीआरआयमार्फत याप्रकरणी आणखी संशयितांचा शोध घेतला जात आहे.

हे ही वाचा:

लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांना लोकल प्रवासाला परवानगी?

अ‍ॅट्रॉसिटी कायद्याविरोधात बोलणाऱ्या आमदाराची आमदारकी रद्द करा

ठाकरे सरकार वारकऱ्यांची मुस्कटदाबी करतंय

दिनो मोरिया मुंबई महापालिकेतील सचिन वाझे

दरम्यान जेएनपीटी बंदरातून आयात करण्यात आलेला हा कंटेनर पंजाबला पाठवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर गेल्यावर्षी देखील डीआरआयने केलेल्या कारवाईमध्ये सुमारे १९१ किलो हेरॉइन जप्त करण्यात आले असून शुक्रवारी जप्त करण्यात आलेला २९३ किलोचा साठा हा गेल्या दहा वर्षातील सर्वात मोठा साठा असण्याची शक्यता आहे. दरम्यान, जेएनपीटी बंदरातून सुरु असलेल्या आयात-निर्यातीच्या व्यवसायातून अनेक वेळा रक्तचंदन, सोने, बंदुक, ड्रग्ज अशा मालाची तस्करी करण्यात येत असल्याचं सीआययू, एसआययू आणि डीआरआय यांनी केलेल्या कारवाईत समोर आलं असून या तस्करीमध्ये मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे.

Exit mobile version