पुण्यातील नक्षलवादी संतोष शेलार उर्फ पेंटर हा २०१० पासून बेपत्ता आहे. संतोष शेलार हा पोलिसांकडे आत्मसमर्पण करण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती समोर आली आहे. संतोष शेलार याला गंभीर आजार झाला असून उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल झाला आहे. शेलार सध्या महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) देखरेखीत आहे.
पुण्यातील भवानी पेठेतील कासेवाडी भागात राहणारा संतोष वसंत शेलार हा २०१० पासून बेपत्ता झाला होता. त्याचा ठावठिकाणा न लागल्याने तो बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात दिली होती. महाराष्ट्र एटीएसने बंदी घातलेल्या सीपीआय माओवादी संघटनेशी संबंध असल्याचा आरोप त्याच्यावर आहे. संतोष शेलार हा माओवादी संघटनेत सक्रीय असून कमांडरपदी कार्यरत असल्याचे वृत्त समोर आले होते. संतोष शेलार याला शहरातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तो सध्या एटीएसच्या नजरेखाली आहे.
हे ही वाचा:
१५ वर्षांच्या जमिनीवरून वादाचे पर्यवसान गँगवॉरमध्ये, नोएडात एकाची हत्या!
भारतीय विमान वापरण्यास मुईझ्झुनी परवानगी नाकारली; मालदीवच्या मुलाचा मृत्यू
राम मंदिरासाठी भेट म्हणून भाविकाने दिले १०१ किलो सोने!
तामिळनाडू सरकारने प्राण प्रतिष्ठाच्या थेट प्रक्षेपणावर बंदी घातली?
संतोष शेलार हा नक्षलवाद्यांच्या सशस्त्र पथकांमध्ये सहभागी झाल्याची माहिती २०१४ मध्ये गडचिरोली पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर तो माओवाद्यांचा कमांडर झाल्याची माहिती समोर आली होती. शेलार हा पुण्यातील नक्षलवादी अंजला सोनटक्के आणि माओवाद्यांचा मोठा नेता मिलिंद तेलतुंबडे यांच्या संपर्कात आला होता. त्यानंतर तो नक्षली चळवळीत सहभागी होऊन भूमिगत झाल्याची माहिती होती. दोन वर्षापूर्वी सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडे ठार झाला होता.