सध्या भारतात क्रिकेट प्रेमींसाठी इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएलचा थरार सुरू आहे. या हंगामात जास्त चर्चा आहे ती मुंबई इंडियन्सच्या संघाची आणि या संघातील खेळाडू रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्याची. रोहित शर्मा याला कर्णधारपदावरुन काढल्यानंतर सोशल मीडियावर मुंबई इंडियन्सला आणि हार्दिक पंड्याला लक्ष्य करण्यात येत आहे. चाहतेही दोन गटात विभागले गेले आहेत. तर इतर संघांचे चाहतेही मोठ्या संख्येने आहेत. अशातच कोल्हापूरमध्ये आयपीएलमुळे एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर जल्लोष करणाऱ्या एकाला जबर मारहाण करण्यात आली असून त्यात त्याचा मृत्यू झाला आहे.
तीन दिवसांपूर्वी मुंबई इंडियन्स विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद असा सामना झाला. या सामन्यात रोहित शर्मा जेव्हा बाद झाला तेव्हा चेन्नई संघाचे चाहते असलेल्या बंडोपंत तिबिले यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी रागात बळवंत आणि सागर यांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. २७ मार्च रोजी रात्री पावणेदहाच्या सुमारास घडलेल्या घटनेत बंडोपंत बापूसो तिबिले (वय ६३ वर्षे) गंभीर जखमी झाले. अखेर तिबिले यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. डोक्याला मार लागून ते गंभीर जखमी झाले होते. मारहाण करणाऱ्या बळवंत महादेव झांजगे (वय ५० वर्षे) आणि सागर सदाशिव झांजगे (वय ३५ वर्षे) यांना करवीर पोलिसांनी अटक केली आहे.
हे ही वाचा :
बारामतीमधून सुप्रिया सुळे तर शिरूर मधून अमोल कोल्हे लोकसभेच्या रिंगणात
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील परभणीची जागा रासपाच्या महादेव जानकरांना
इंजिनीअरच्या हत्येनंतर चीनने थांबवले पाकिस्तानमधील धरणाचे बांधकाम
इस्रायलला दोन हजारांहून अधिक बॉम्ब, २५ एफ-३५ लढाऊ विमाने देण्यास अमेरिकेची मंजुरी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी बळवंत झांजगे आणि सागर झांजगे हे इतरांससह गल्लीमध्ये एका घरात आयपीएलचा सामना पाहत होते. हे दोघेही मुंबई इंडियन्सचे चाहते आहेत. हैदराबादने धावांचा डोंगर उभा केल्याने त्यांना आधीच राग आला होता. त्यामुळे धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा बाद होताच चेन्नई सुपर किंग्जचे चाहते बंडोपंत तिबिले त्याठिकाणी पोहोचले. यावेळी त्यांनी रोहित शर्मा आऊट झाल्याने आता मुंबईचा संघ कसा जिंकणार असे म्हणत आनंद व्यक्त केला. यावेळी रागावलेल्या बळवंत आणि सागर यांनी त्यांच्यावर हल्ला केला. अत्यंत किरकोळ कारणावरून झालेल्या मारहाणीच्या घटनेने परिसरातही खळबळ उडाली आहे.