पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबाबत अपशब्द वापरल्याबद्दल कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्दारमैया यांचा मुलगा यथिंद्र यांच्या विरोधात निवडणूक आयोगाने चमरजंगारा जिल्ह्यातील हनूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
१ एप्रिल रोजी निवडणूक विभागाच्या भरारी पथकाचे अधिकारी गुंडूराव यांनी ही तक्रार दाखल केली असून यथींद्र यांच्यावर योग्य कारवाई करण्याची मागणी केली आहे. यथिंद्र यांनी अमित शहा यांच्याबद्दल अपशब्द वापरून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. यथिंद्र यांनी नुकतेच अमित शहा यांना ‘गुंडा’ आणि ‘रावडी’ असे संबोधून मोदी यांचे सहकारी असे असतात, अशी टीका केली होती.
२८ मार्च रोजी चमरजंगारा जिल्ह्यातील काँग्रेसच्या सभेत बोलताना यथिंद्र यांनी शाह यांच्यावर गुजरातमध्ये हत्येचे गुन्हे दाखल झाल्याचे आणि त्यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी कारवायांची असल्याचे सांगत ते आता देशात उच्च पदावर आहेत, असे म्हटले होते. त्यानंतर २९ मार्च रोजी निवडणूक आयोगाने त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर यथिंद्र यांनीही बाजू मांडली आहे.
हे ही वाचा:
ख्रिश्चन धर्म स्वीकाराण्यासाठी आर्थिक आमिष
केजरीवाल ‘आत’ गेल्यावर आता संजयसिंग ‘बाहेर’
कुराण जाळणाऱ्या इराकच्या सलवान मोमिकचा मृत्यू?
देश पेटविण्याची भाषा करणाऱ्या काँग्रेसचा देशातून सफाया करा!
‘मी जे काही गुन्हे त्यांच्यावर दाखल होते, ते सांगितले. त्यात कोणतीही अतिशयोक्ती नव्हती. मी निवडणूक आयोगाला योग्य तो प्रतिसाद दिला आहे,’ असे यथिंद्र यांनी स्पष्ट केले. तर, यथिंद्र यांचे वक्तव्य आधीच्या पोलिस रेकॉर्डनुसारच होते, त्यात काहीही नवी नाही, असे सांगून मैसुरू जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष आर. मूर्ती यांनी यथिंद्र यांची बाजू घेतली आहे. मात्र ‘त्यांची वक्तव्ये केंद्रीय मंत्र्यांवर केलेला वैयक्तिक हल्ला होता. न्यायालयाने त्यांची सर्व गुन्ह्यांतून निर्दोष सुटका केली आहे. त्यामुळे कोणी त्यांना गुंड कसे म्हणू शकते?,’ असा प्रश्न भाजपचे जिल्हाध्यक्ष सीएस निरंजना कुमार यांनी विचारला आहे.