जम्मू-काश्मिरमधील पुंछ जिल्ह्यात सुरक्षा दलाने मोठी कारवाई केली आहे. सुरनकोट भागात शिंद्रा टॉप येथे सोमवार, १७ जुलै रोजी रात्री झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. त्यांची ओळख अद्याप पटलेली नसून त्यांच्याकडून शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
जम्मू-काश्मीर पोलिस आणि सैन्याने ही संयुक्त मोहिमेत ही यशस्वी कामगिरी केली आहे. माहितीनुसार, रात्रभर सुरू असलेल्या गोळीबारात चारही अतिरेकी मारले गेले आहेत. मात्र, त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यांच्याकडून चार एके रायफल, दोन पिस्तूल आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
यापूर्वी सोमवारी पहाटे, पूंछ जिल्ह्यातील कृष्णा घाटी सेक्टरमध्ये सैन्य आणि जम्मू- काश्मीर पोलिसांनी नियंत्रण रेषेवरून (एलओसी) घुसखोरीचा मोठा प्रयत्न हाणून पाडत दोन घुसखोर ठार केले होते. त्यामुळे मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची संख्या सहा झाली आहे. घटनास्थळावरून एका मॅगझिनसह एक एके ७४ रायफल, ११ राउंड आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
स्वातंत्र्यवीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाची नवी शिंपलाकृती इमारत
छोटा शकीलचे आर्थिक व्यवहार संभाळणाऱ्या आरिफ भाईजानची संपत्ती जप्त
किरीट सोमय्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार
कथित व्हिडीओ प्रकरणी किरीट सोमय्यांची चौकशीची मागणी
यापूर्वी २४ जून रोजी, कृष्णा घाटी भागात नियंत्रण रेषेवर तीन दहशतवाद्यांना गोळ्या घालण्यात आल्या होत्या. या मोहिमांमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला होता. तर, काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी ड्रोन देखील पाडण्यात आले होते. ड्रग्स घेऊन हे ड्रोन भारतात घुसण्याच्या प्रयत्नात असताना सुरक्षा दलाकडून कारवाई करण्यात आली होती .