गडचिरोली पोलिसांची कारवाई; महाराष्ट्र- छत्तीसगड सीमेवरील माओवादी कॅम्प उद्ध्वस्त

गडचिरोली पोलिसांची कारवाई; महाराष्ट्र- छत्तीसगड सीमेवरील माओवादी कॅम्प उद्ध्वस्त

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर असून गडचिरोली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी महाराष्ट्र- छत्तीसगड सीमेवरील माओवादी कॅम्प उद्ध्वस्त केल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी शस्त्रसाठा आणि साहित्य जप्त करण्यात आले आहे. पोलिसांच्या कारवाईनंतर माओवाद्यांनी पलायन केले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माओवादी सक्रिय झाले आहेत. काही दिवसांपूर्वी रेपनपल्ली हद्दीत झालेल्या चकमकीत पोलिसांनी चार नक्षल्यांना कंठस्नान घातले होते. गुरूवारीदेखील छत्तीसगड सीमेवर मध्यरात्री सहा तास चकमक झाली. यानंतर २९ मार्चला पहाट अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम दामरंचा येथे अशोक तलांडी या आदिवासी तरुणाचा गळा आवळून खून करत माओवाद्यांनी ताडगावजवळ पत्रक टाकले होते. दरम्यान, पेंढरीपासून १२ किलोमीटरवर पूर्वेला छत्तीसगडच्या मानपूर जिल्ह्यातील चुटीनटोला गावाजवळ ४५० मीटर उंच पहाडीवर माओवादी तळ ठोकून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

कसनसूर-चातगाव दलम आणि छत्तीसगडच्या औंधी दलमचे काही सशस्त्र माओवादी आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विध्वंसक कारवाया करण्यासाठी छत्तीसगडमधील मोहल्ला मानपूर जिल्ह्यातील छत्तीसगड- महाराष्ट्र सीमावर्ती भागातील चुटीनटोला गावाजवळ तळ ठोकून असल्याची विश्वासार्ह माहिती पोलिसांना मिळालीह होती. या माहितीच्या आधारे अप्पर पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या नेतृत्वात विशेष अभियान पथकाच्या जवानांद्वारे जंगल परिसरात लगेच माओवादविरोधी अभियान राबविण्यात आले.

 ही वाचा :

अरविंद केजरीवालांना १४ दिवसांची न्यायालयीने कोठडी

ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींना ‘भारतरत्न’ पुरस्कार

काँग्रेसने भारताचे बेट श्रीलंकेला देऊन टाकले; पंतप्रधान मोदींनी साधला निशाणा

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर जल्लोष करणाऱ्याला मारहाण; ६३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

अभियान पथक शनिवारी ४५० मीटर उंच टेकडीवर पोहोचले त्यावेळी माओवादी या ठिकाणहून पाळले होते. मात्र, या ठिकाणावर शोधमोहीम राबविली असता त्याठिकाणी माओवाद्यांचे मोठे आश्रयस्थान आणि छावणी सापडली. तो कॅम्प अभियान पथकाद्वारे नष्ट करण्यात आला. यावेळी घटनास्थळावरून कॉर्डेक्स वायर, डिटोनेटर्स, जिलेटिन स्टिक्स, बॅटरी, वॉकीटॉकी चार्जर, बॅकपॅक आदींसह मोठ्या प्रमाणात माओवादी साहित्य जप्त करण्यात आले. विशेष अभियान पथकाची सर्व पथके रविवार, ३१ मार्च रोजी गडचिरोलीला सुखरूप पोहोचले.

Exit mobile version