टोयोटा कारला लोकप्रियता मिळवून देणारे प्रसिद्ध उद्योगपती आणि टोयोटा किर्लोस्कर मोटरचे उपाध्यक्ष विक्रम एस किर्लोस्कर यांचे निधन झाले आहे. ते ६४ वर्षांचे होते. मंगळवारी रात्री उशिरा हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याचे कंपनीने म्हटलं आहे. आज (बुधवार) दुपारी बेंगळुरू येथील हेब्बल स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
विक्रम किर्लोस्कर यांच्या पश्चात पत्नी गीतांजली आणि मुलगी मानसी किर्लोस्कर असा परिवार आहे.उपाध्यक्ष विक्रम एस किर्लोस्कर यांचे अकाली निधन झाले. ही माहिती देताना आम्हाला खूप दुःख होत आहे. या दुःखाच्या प्रसंगी त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच सर्वांनी प्रार्थना करावी असे कंपनीने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटलं आहे.
विक्रम किर्लोस्कर यांचा जन्म नोव्हेंबर १९५८मध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव श्रीकांत किर्लोस्कर. विक्रम यांनी उटी येथील लॉरेन्स शाळेत शिक्षण घेतले. विक्रम किर्लोस्कर हे मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे पदवीधर होते आणि त्यांनी सीआयआय, सियाम आणि एआरएआय या संस्थांमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले होते. विक्रम किर्लोस्कर हे किर्लोस्कर समूहाच्या चौथ्या पिढीचे प्रमुख होते. ते किर्लोस्कर सिस्टम्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक होते. याशिवाय ते किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट लिमिटेडचे उपाध्यक्षही होते. किर्लोस्कर व्यवसायिक कुटुंबातील चौथ्या पिढीतील सदस्य आहेत.
हे ही वाचा :
सूरतमध्ये केजरीवालांच्या प्रचार रॅलीमध्ये दगडफेक
नाशिक आश्रमातील मुलींवरील अत्याचारप्रकरणी चित्रा वाघ यांनी घेतली कठोर भूमिका
शिवडीचा किल्ला अतिक्रमणातून मुक्त करणार
राहुल गांधींविरोधात रणजीत सावरकर यांचा नोंदविला जबाब
सुरुवातीला ते पुण्यातील किर्लोस्कर कमिन्समध्ये उत्पादन क्षेत्रात प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू झाले. १९९० च्या उत्तरार्धात टोयोटाचा व्यवसाय भारतात आणण्याचे श्रेय किर्लोस्कर यांना जाते. आज, टोयोटाच्या भारतातील व्यवसायात अनेक कंपन्या आहेत, ज्यात किर्लोस्कर सिस्टम्स भागीदार आहेत.