मविआ सरकारच्या नाकर्तेपणामुळेच वेदांत प्रकल्प गुजरातला

उदय सामंत यांनी केले स्पष्टीकरण

मविआ सरकारच्या नाकर्तेपणामुळेच वेदांत प्रकल्प गुजरातला

वेदांताचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यावरून विराेधकांकडून उलटसूलट टीका सध्या सुरू आहे. महाविकास आघाडी सरकारने ३९ हजार काेटी रुपयांचे पॅकेज देऊनही भाजप शिवसेना- भाजप हा प्रकल्प पुढे नेऊ शकला नाही हा राजकीय गैरसमज निर्माण करून स्वत:ची पाेळी भाजून घेण्याचा प्रयत्न असल्याचा आराेप उद्याेगमंत्री उदय सामंत यांनी या टीकेला उत्तर देताना केला आहे.

राज्यात शिवसेना- भाजपचे सरकार येऊन फक्त दाेनच महिने झाले आहेत. पण त्याआधीचे सात महिने मविआ सरकारच्या हातात हाेते. फाॅक्सकाॅन प्रकल्प महाराष्ट्रात येण्यास इच्छूक नाही असे विधान तत्कालिन उद्याेग मंत्री सुभाष देसाई यांनी केलं हाेतं. त्या मविआ सरकारच्या नाकार्तेपणामुळेच वेदांत गुजरातला गेली अशा आशयाच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यामुळे आमच्यावर टीका करणाऱ्यांच्या हातात सहा महिने असतानाही तत्कालीन सरकारने काहीही केले नाही. फाॅक्सकाॅन कंपनी महाराष्ट्रात येणार नाही ही मानसिकता करूनच मविआ सरकारमधील मंडळी काम करत हाेती असा आराेपही उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

जनतेच्या विशेष करून महाराष्ट्रातील युवापिढीच्या मनात काेणत्याही प्रकारचा संभ्रम राहू नये यासाठी ही पत्रकार परिषद घेत असल्याचे स्पष्ट करुन मंत्री उदय सामंत म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने ३९ हजार पॅकेज दिले हाेते. तरी देखील हा प्रकल्प दाेन महिन्यांमध्ये शिवसेना – भाजप सरकार हा प्रकल्प पुढे नेऊ शकला नाही, असा आराेप केला जात आहे. परंतु असं काहीही झालेलं नाही. महाविकास आघाडीच्या काळात असं काेणतेही पॅकेज ठरलेलं नव्हतं असंही सामंत यांनी स्पष्ट केलं.

हे ही वाचा:

महाराष्ट्रातल्या या पक्षांवर निवडणूक आयोगाची कारवाई

अयोध्येतील राम मंदिरावर १८०० कोटी खर्च होणार

इलेक्ट्रिक स्कूटर रिचार्जिंग युनिटला लागलेल्या आगीत १० जणांचा मृत्यू

मुख्यमंत्री शिंदेंकडून ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ जाहीर

प्रकल्पाबाबत चर्चा सुरू झाल्यानंतर तीन महिन्यानंतर म्हणजे ५ जानेवारी २०२२ ला महाराष्ट्र शासनाला कंपनीने पत्र पाठवलं हाेतं. हा प्रकल्प चार राज्यात करू इच्छिताे त्यात महाराष्ट्र आहे. या प्रकल्पासाठी काेणत्या प्रकारचे इन्सेटिव्ह, सुविधा तुम्ही देऊ शकता याची माहिती आम्हाला द्यावी अशा आशयाचे पत्र कंपनीने दिले हाेते. सेना- भाजपचे नवे सरकार ३० जूनला स्थापन झाले. पण आमच्यावर टीका करणाऱ्यांच्या हातात सहा महिने हाेते. या सहा महिन्यात जागा निश्चित करणे, बाकीच्या राज्यांप्रमाणे कमी दरात वीज द्यावी, जमिन ९९ वर्षांच्या कराराने द्यावी इन्सेटिीव्ह पॅकेजमध्ये उजवं पॅकेज द्यावं अशा मागण्या कंपनी सहा महिने करीत हाेती. या सहा महिन्यात फक्त भेटीगाठी झाल्या. पण फाॅक्सकाॅन ही कंपनी महाराष्ट्रात येणार नाही ही मानसिकता करूनच मविआ सरकारमधील मंडळी कामाला लागली हाेती .

प्रकल्प गुजरातला गेल्याचं खापर आमच्यावर फाेडलं जात आहे. जे सगळं वाई हाेतं ते आमच्यामुळं आणि चांगली घडतं ते तुमच्यामुळे असं हाेत नसतं. ही राजकारणातील वाईट वृत्ती आहे. असं सांगून मंत्री सामंत यांनी मविआ सरकारच्या गेल्या सात महिन्यातील धाेरणांमुळे हा प्रकल्प गुजरातला गेला असा आराेप केला आहे.

वेदांत प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्याशी चर्चा केली आहे. भविष्यात यापेक्षा माेठा प्रकल्प महाराष्ट्राला देऊ. जाे राेजगार अपेक्षित आहे ताे आम्ही देऊ असं आश्वासनही पंतप्रधान माेदी यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिलं असल्याचं उदय सामंत यांनी यावेळी सांगितलं.

Exit mobile version