पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्वात विश्वासू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गृहमंत्री अमित शहा यांना सहकार मंत्रालयाची जबाबदारी मिळाल्यानंतर आता महाराष्ट्राच्या सहकारी संस्थांना चांगलीच बळकटी लाभली आहे. महाराष्ट्रातील सहकारी संस्थांना तब्बल १७४३८.४७ कोटींचे वित्तीय साह्य देण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांनी दिली. यातील विशेष बाब म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील सरकारच्या काळात यापैकी ९ हजार ३०० कोटी रुपये देण्यात आले आहेत. अमित शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार सहकारी क्षेत्रात आता स्टार्टअपसाठी युवा सहकार योजना सुरु करण्यात आली आहे. तसेच सहकारी संस्थांना प्रोत्साहनही आता मिळणार आहे.
मोदी सरकारमध्ये नुकतेच एक नवं सहकार मंत्रालय तयार करण्यात आलं आहे. ७ जुलैला झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात त्याची जबाबदारी अमित शहा यांना सोपवण्यात आली आहे.
अमित शहा हे दीर्घकाळ अहमदाबाद जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचे प्रमुख राहिले आहेत. त्यामुळे सहकार क्षेत्राचा त्यांचा अभ्यास आणि अनुभव दांडगा आहे. अमित शहा यांच्या हातात सहकार क्षेत्र आल्यावर सहकार क्षेत्रातील अनेक महत्त्वाच्या बाबींमध्ये आता सुधारण झालेली आहे. सहकारी संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी वित्तीय मदत दिली जाते.
हे ही वाचा:
टिपू सुलतानवरून पु्न्हा संघर्ष चिघळणार
सलग चौथ्या ऑलिम्पिकमध्ये भारताला कुस्तीत पदक
मुदत कर्जाव्यतिरिक्त राज्यांच्या श्रेणीनुसार सहकारी संस्थांना १५ ते २५ टक्के सबसिडीही दिली जाते. याआधी सहकार क्षेत्रातील कामं कृषी मंत्रालयांतर्गत येत होती. पण आता त्याला स्वतंत्र मंत्रालयाचं रूप देण्यात आलं आहे. भारत सरकारच्या माध्यम विभागानं स्वतंत्र सहकार मंत्रालयाबाबत एक प्रसिद्धी पत्रक जारी केलं होतं. देशातील सहकारी चळवळीला बळकटी देण्यासाठी स्वतंत्र धोरण आणि प्रशासकीय यंत्रणा तयार कण्यात येणार असल्याचं यात म्हटलं होतं.