देशभरात फास्टॅग सक्तीचे झाल्यानंतर देशभरातून या द्वारे होणारी टोल वसूली वाढली असल्याचे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने (नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया- एनएचएआय) सांगितले आहे. दिनांक १६ फेब्रुवारी २०२१ पासून देशातील सर्व टोल नाक्यांवर फास्टॅग सक्तीचे केल्यानंतर या मार्गांनी होणारी टोल वसूली ₹१०४ कोटींपर्यंत पोहोचली आहे.
हे ही वाचा:
या आठवड्यात फास्टॅगच्या माध्यमातून होणारी वसूली सातत्याने ₹१०० कोटींच्या वर राहिली आहे आणि २५ फेब्रुवारी रोजी ती सर्वोच्च ₹१०३.९४ कोटी पर्यंत पोहोचली होती. सुमारे ६४.५ लाख देवाणघेवाणींतून इतकी रक्कम गोळा झाली आहे.
एनएचएआयने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार फास्टॅमुळे इलेक्ट्रॉनिक टोल वसूलीमध्ये २० टक्क्यांची वाढ झाली आहे, तर फास्टॅगमुळे गोळा होणाऱ्या फीच्या रुपाने देखील २७ टक्के वाढ झाली आहे.
गेल्या दोन आठवड्यात सुमारे २० लाख लोकांनी फास्टॅगचा वापर करायला सुरूवात केली आहे. त्यामुळे फास्टॅग वापरकर्त्यांची संख्या आता सुमारे २.८ कोटींच्या घरात जाऊन पोहोचली आहे.
एनएचएआयच्या प्रसिद्धीपत्रकानुसार टोल वसुली सुलभ झाली आहे. फास्टॅगचा वापर भविष्यात रस्त्यांवरून मिळणाऱ्या परताव्याचे अचूक गणित करण्यास उपयोगी ठरू शकेल. त्यामुळे भविष्यातील महामार्ग बांधणीच्या प्रकल्पांना चालना मिळेल.