वर्षभरापूर्वी मुंबईत आलेल्या टोरेस या विदेशी कंपनीने जवळपास सव्वा लाख भारतीयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या कंपनीने ज्वेलरी आणि ‘माजोनाईट’ डायमंड विक्रीच्या नावाखाली गुंतवणूक करणाऱ्याना प्रत्येक आठवड्याला ६ टक्के व्याज असे एकूण ५२ आठवडे व्याज देण्याचे आमिष दाखवून जवळपास सव्वा लाख गुंतवणूकदारांची हजारो कोटींची फसवणूक केली आहे. या प्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी गुन्हा दाखल करून कंपनीच्या मराठी संचालक, रशियन महिलेसह उझबेकिस्तान देशाच्या महिलेला असे एकूण तिघांना अटक केली आहे. यातील मुख्य आरोपी हे युक्रेन देशाचे नागरिक असून त्यांनी युक्रेन मध्ये पळ काढला आहे. पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध एल ओ सी जारी केली आहे.
ठाणे, मिरारोड ,नवी मुंबई या येथे या कंपनीच्या शाखा असून संबंधित पोलीस ठाण्यात गुंतवणूकदारांनी गर्दी केली असून संबंधित पोलीस ठाण्यात देखील गुन्हा दाखल करण्यात येत असल्याची माहिती एका अधिकारी यांनी दिली. गुंतवणूकदारांची फसवणुकीचा आकडा ५०० कोटींच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवाजी पार्क पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दादर पश्चिम येथील जे.के.सावंत मार्गावर टोरेस वास्तु सेंटर इमारतीत ‘टोरेस ब्रेड’ चालविणाऱ्या प्लॅटिनम हर्न प्रा. लि. या कंपनीचे शो-रूमआणि कार्यालय आहे. वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या या कंपनीचे संचालक सर्वेश अशोक सुर्वे , व्हिक्टोरिया कोवालेन्को, सीईओ तौफिक रियाझ उर्फ जॉन कारटर तसेच कंपनीच्या जनरल मॅनेजर तानिया कॅसातोवा आणि कंपनीची स्टोअर इंजार्च व्हॅलेंटीना कुमार यांनी गुंतवणूकदारांना ‘मोजोनाईट’ हा खडा खरेदी केल्यावर गुंतवणूक रक्कमेवर आठवड्याला ६ टक्के प्रमाणे ५२ आठवडे परतावा देण्याचे आमिष दाखवले होते. या आमिषाला बळी पडून हजारो गुंतवणूकदारांनी या कंपनीत कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली होती.
शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यातील तक्रारदार हा दादर येथील भाजीपाला होलसेल विक्रेता आहे. हा विक्रेता खार येथे राहणारा असून त्याने त्याचे आणि त्याच्या नातेवाईक,मित्र, त्याच्याकडे काम करणाऱ्या कर्मचारी तसेच तक्रारदार यांच्या माहितीतील लोक असे एकूण ४० जणांनी जून २०२४ मध्ये प्लॅटिनम हर्न प्रा. लि. या कंपनीत जवळपास १३ कोटी ४८ लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. प्रत्येक आठवड्याला कंपनीकडून परतावा बँक खात्यात जमा होत होता, मात्र अचानक डिसेंबर २०२४ पासून आठवड्याला येणारा परतावा बंद झाला, तक्रारदार यांनी १ जानेवारी २०२५ रोजी दादरच्या शो रूम चौकशी केली असता बँकेत टेक्निकल प्रॉब्लेम झाल्यामुळे या आठवड्यात रक्कम जमा झाली नाही, पुढच्या आठवड्यात दोन्ही रकमा एकत्र जमा करण्यात येईल असे तक्रारदार यांना सांगण्यात आले.
हे ही वाचा:
दिल्लीतील राजघाटावर बनणार माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे स्मारक!
सदस्य नोंदणीसाठी भाजपाचे १० जानेवारी रोजी ‘घर चलो अभियान’
संतोष देशमुखांचे अखेरचे शब्द…आता बास करा, मला मारू नका!
संतोष देशमुख यांच्या पत्नीला सरकारी नोकरी मिळणार, भाऊ धनंजय देशमुख यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
दुसऱ्या आठवड्यात तक्रारदार आणि इतरांच्या खात्यात रक्कम जमा झाली नसल्यामुळे तक्रारदार यांनी ६ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजता कंपनीचा सुपरवायझर अबरार शेख याला संपर्क साधला असता ‘थोडा गडबड हो गया आप आ जावो’ असे अबरारने सांगितले असता तक्रारदार याने दादर च्या शो रूम कडे धाव घेतली असता शो रूम च्या बाहेर अनेक गुंतवणूकदारांनी गर्दी केली होती. तक्रारदार याने शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, टोरेस या कंपनीत १ लाख २५ हजार गुंतवणूकदार असून त्यांची जवळपास शेकडो कोटींची फसवणूक झाली आहे.
शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात टोरेस ब्रेड चालविणाऱ्या प्लॅटिनम हर्न प्रा. लि. ही कंपनी,तसेच कंपनीचे संचालक सर्वेश अशोक सुर्वे यांच्यासह पाच जणां विरुद्ध फसवणूक, तसेच महाराष्ट्र ठेवीदाराच्या हितसंबधाचे संरक्षण अधिनियम कायदा (एम.पी.आय.डी.ॲक्ट) कलम ३,४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली असून त्यांच्या तक्रारी नोंद करून घेण्यात येत असून फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मंगळवारी पोलिसांनी तानिया, व्हलेटिना आणि सर्वेश सुर्वे यांना या प्रकरणात अटक दाखविण्यात आली असून त्यांना सायंकाळी सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. यातील मुख्य आरोपी हे युक्रेन देशाचे नागरिक असून त्यांनी युक्रेन मध्ये पळ काढला आहे. पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध एल ओ सी जारी केली आहे.