शेअर बाजारातील बिग बुल राकेश झुनझुनवाला यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यानंतर त्यांच्या ट्रस्टची जबाबदारी कोण घेणार हा प्रश्न पडला होता. या प्रश्नाचे उत्तर सापडले असून राकेश झुनझुनवाला ट्रस्टची कमान राधाकृष्ण दमानी हे सांभाळणार असल्याची माहिती समोर आली आहे.
राधाकृष्ण दमानी हे राकेश झुनझुनवाला यांचे अत्यंत विश्वासू मित्र आणि त्यांचे गुरू असल्याचे सांगितले जाते. राधाकृष्ण दमानी हे झुनझुनवाला ट्रस्टचे मुख्य ट्रस्टी असतील तर त्यांच्यासोबत कल्पराज धारांशी आणि अमर पारिख हे अन्य दोन सहकारी असणार आहेत.
राकेश झुनझुनवाला यांची पत्नी रेखा यादेखील गुंतवणूकदार असून त्यांच्या आणि राकेश झुनझुनवाला यांच्या नावाने Rare Enterprises ही ट्रेडिंग कंपनी आहे. या कंपनीचे व्यवस्थापन त्यांचे दोन सहकारी उत्पल सेठ आणि अमित गोएला यांच्याकडे असेल. उत्पल सेठ हे राकेश झुनझुनवाला यांना गुंतवणुकीसाठी मदत करत होते.
राकेश झुनझुनवाला यांचे १४ ऑगस्ट रोजी निधन झालं. राकेश झुनझुनवाला यांची ५.८ अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. राकेश झुनझुनवाला हे देशातील ४८ व्या क्रमाकाचे श्रीमंत व्यक्ती होते. ते गुंतवणूकदार आणि यशस्वी उद्योजकदेखील होते.
राकेश झुनझुनवाला हे एक व्यापारी असून ते सीएदेखील होते. ऍपटेक आणि हंगामा मीडिया याचे झुनझुनवाला हे चेअरमन होते. तर व्हॉईसरॉय हॉटेल्स, प्रोवोग इंडिया, कॉनकॉर्ड बायोटेक आणि जिओजित वित्तीय सेवा या कंपन्यांच्या संचालकीय मंडळातही त्यांचा समावेश होता.
हे ही वाचा:
आता शिवसेनेला वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा
एम्स आता ओळखले जाणार ‘या’ नावाने
इकबाल कासकरच्या बॉडीगार्डला मारणाऱ्या फरार आरोपीच्या आवळल्या मुसक्या
“उद्धव ठाकरेंनी शिवाजी महाराजांसारखा तह करायला हवा होता”
राकेश झुनझुनवाला यांनी वडिलांच्या मार्गदर्शनात शेअर बाजारातील गुंतवणुकीस सुरुवात केली होती. पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीपासून त्यांनी त्यांच्या प्रवासाला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी स्वतःच्या बुद्धीमत्तेच्या जोरावर आपले अब्जावधी रुपयांचे साम्राज्य उभे केले होते. राकेश झुनझुनवाला जे शेअर घ्यायचे त्याच्या किंमती वाढायच्या असं गुंतवणूकदारांच म्हणणं होतं त्यामुळे ते कोणत्या कंपनीचे शेअर घेतात, याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष असायचे.