ठाकरे सरकारच्या नियोजनशून्य आणि भोंगळ कारभारामुळे महाराष्ट्र हा देशाची कोरोना राजधानी बनली, आता कोविड लसीकरणाबाबतही ठाकरे सरकारचे राजकारण सुरू आहे, आऱोग्य कर्मचा-यांच्या लसीकरणाबाबत सरकारची चालढकल सुरू असून देशात लसीकरणाच्या यादीत महाराष्ट्र आठव्या क्रमांकावर आला आहे, या ढील्या कारभाराची जबाबदारी स्वीकारून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपाने केली आहे.
महाराष्ट्राला कोरोना क्रमवारीत नंबर एक बनवणाऱ्या ठाकरे सरकारचा अकार्यक्षम कारभार जारी आहे. लसीकरणाचा सुद्धा बोऱ्या वाजवण्याचे काम सुरू आहे… @rajeshtope11 राजीनामा द्या pic.twitter.com/GqG1Cb3Rxg
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 20, 2021
ठाकरे सरकारच्या अजब-गजब कारभारामुळे कोविड मृत्युदराच्या बाबतीत महाराष्ट्र देशात ‘नंबर १’ आहे. पण जेव्हा लसीकरणाची वेळ आली तेव्हा मुंबईसह सर्व राज्यात ही मोहिम मंद गतीने सुरू आहे. दिनांक १९ जानेवारी रोजी मुंबईत फक्त १३ लोकांना तर राज्यात फक्त १८१ लोकांनाच कोविड लस देण्यात आली. या आकडेवारीसह लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्र देशात आठव्या स्थानावर आहे.
“राज्याचा मृत्युदर आजही २.५४% आहे. सध्या देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या घटत चालली आहे तरी आजही देशातील ४२% रुग्ण हे केवळ महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यात आहेत. महाराष्ट्रात लसीकरण मोहीम अधिक गांभीर्याने घेऊन जलद आणि नियोजनबद्ध पद्धतीने राबवायची गरज होती. परंतु फक्त केंद्राकडे बोट दाखवण्याचे काम राज्य सरकार करत आहे.” असा हल्लाबोल भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी केला आहे. ठाकरे सरकारने या अकार्यक्षमतेला जबाबदार धरून आरोग्यमंत्री टोपे यांची हकालपट्टी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
१९ जानेवारी २०२१ च्या आकडेवारीनुसार कर्नाटक राज्य लसीकरणाच्या बाबतीत क्रमांक १ ला आहे. कर्नाटकमध्ये ८०,६८६ नागरिकांना लस देण्यात आली आहे. दोन नंबरला असणाऱ्या तेलंगणात ६९,४०५ लोकांना लस दिली गेली आहे, तर ५८,४९५ या लसीकरणाच्या आकड्यासह आंध्रप्रदेश तिसऱ्या क्रमांकावर आहे. आठव्या क्रमांकावर असणाऱ्या महाराष्ट्रात ३०,२४७ लोकांना लस देण्यात आली आहे.