सोमवारच्या घसरणीनंतर शेअर बाजार सावरला; कोणत्या शेअर्समध्ये झाली वाढ?

मंगळवार, ८ एप्रिल रोजी शेअर बाजार तेजीत उघडला

सोमवारच्या घसरणीनंतर शेअर बाजार सावरला; कोणत्या शेअर्समध्ये झाली वाढ?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेल्या टॅरिफ वॉरमुळे जगभरात सोमवारी आर्थिक चक्र रुळावरून खाली घसरलेले दिसले. अमेरिकन शेअर बाजारासह आशियाई शेअर बाजारांमध्येही मोठ्या हालचाली दिसून आल्या. आठवड्याच्या पहिल्याचं दिवशी मुंबई शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळाली. मात्र, सोमवारच्या मोठ्या घसरणीनंतर आता भारतीय शेअर बाजार सावरला असून तेजीच्या रुळावर परतला आहे.

आठवड्याच्या दुसऱ्या व्यापार दिवशी, देशांतर्गत शेअर बाजारात सगळीकडे सुस्थिती पाहायला मिळत आहे. अमेरिकेच्या आयात शुल्कामुळे जगभरातील शेअर बाजारांना हादरे बसलेले असताना मोठ्या घसरणीनंतर दुसऱ्या दिवशी देशांतर्गत बाजाराने जोरदार कम बॅक केलं आहे. यामुळे गुंतवणूकदारांनीही सुटकेचा श्वास घेतला आहे.

गेल्या १० महिन्यांतील एका दिवसातील सर्वात मोठी घसरण सोमवारी झाल्यानंतर, मंगळवार, ८ एप्रिल रोजी शेअर बाजार तेजीत उघडला. सकाळी ९.१५ वाजता, बीएसई सेन्सेक्स १,१४१.१४ अंकांनी किंवा १.५६ टक्क्यांनी वाढून ७४,२७९.०४ वर पोहोचला. तर एनएसई निफ्टी ४०१.१० अंकांनी किंवा १.८१ टक्क्यांनी वाढून २२,५६२.७० वर पोहोचला. आजच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांमध्ये तेजी दिसून आली. बँक, वित्तीय, ऑटो, आयटी, धातू, फार्मा आणि रिअल्टीसह सर्व प्रमुख निर्देशांक निफ्टीवर हिरव्या रंगात व्यवहार करत आहेत. चीनसह इतर जागतिक बाजारपेठांमधील सुधारणांमुळे देशांतर्गत बाजारपेठेलाही काही प्रमाणात पाठिंबा मिळत आहे.

मंगळवारी सकाळी अनेक शेअर्स हिरव्या चिन्हावर उघडले. यामध्ये टायटन, बजाज फिनसर्व्ह, अदानी पोर्ट, एसबीआय, अ‍ॅक्सिस बँक इत्यादींचा समावेश होता. यापैकी सर्वात जास्त वाढ टायटनच्या शेअर्समध्ये दिसून आली. बाजार उघडल्यानंतर १५ मिनिटांतच शेअर ५ टक्क्यांहून अधिक वाढला. त्याच वेळी, अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्येही घसरण दिसून आली. यामध्ये पॉवर ग्रिड, नेस्ले इंडिया इत्यादी कंपन्यांचे शेअर्स समाविष्ट आहेत.

हे ही वाचा:

दहावी, बारावी बोर्डाची वेबसाईट सायबर सुरक्षित करा !

एलपीजी सिलेंडर ५० रुपयांनी महागले!

विवान कारुळकरचा ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्सचे सन्मानचिन्ह देऊन गौरव

सौदी अरेबियाने भारतासह १४ देशांच्या व्हिसावर घातली बंदी; कारण काय?

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे की, ते सध्या टॅरिफ योजना थांबवणार नाहीत. तथापि, त्यांनी निश्चितपणे सांगितले की, ते चर्चेसाठी तयार आहेत. त्यांनी असेही म्हटले की बाजारातील घसरणीसाठी ते जबाबदार नाहीत. ट्रम्प म्हणाले, “कधीकधी तुम्हाला काहीतरी ठीक करण्यासाठी औषधाची आवश्यकता असते.” त्यांनी टॅरिफचे वर्णन एक औषध म्हणून केले आहे.

राज ठाकरेंकडून तरी शिका... | Dinesh Kanji | Raj Thackeray | Marathi | MNS|

Exit mobile version