जगातील सगळ्यात मोठी इलेक्ट्रिक गाड्यांचे उत्पादन करणारी कंपनी टेस्ला आता भारतीय बाजारपेठेत पाय रोवणार आहे. यासाठी कंपनीने एका राज्याची निवड केली असून तिथे कंपनी आपले उत्पादन करणारे युनिट उभारणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी दिलेल्या मागहितीनुसार, टेस्ला ही इलॉन मस्कची जगातली सगळ्यात श्रीमंत कंपनी कर्नाटकमध्ये इलेक्ट्रिक कार उत्पादक युनिट सुरू करणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्पातून राज्याला मिळणाऱ्या फायद्यांचा उल्लेख करुन मुख्यमंत्र्यांनी ही माहिती एका निवेदनामार्फत दिली.
दिलेल्या माहितीनुसार, तुमकूरु जिल्ह्यामध्ये औद्योगिक कॉरिडोरही बांधला जाणार आहे. याची किंमत सुमारे ₹७,७२५ कोटी असणार आहे. तर यामुळे २.८ लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. अमेरिकन इलेक्ट्रिक कार कंपनीने जानेवारीमध्ये यासाठी भारतात कंपनीची नोंदणी केली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टेस्लाने बेंगळुरू शहरातही संशोधन आणि विकास केंद्र उघडलं आहे.
टेस्ला कंपनीने कर्नाटकमधील बंगळुरु इथे टेस्ला इंडिया मोटर्स अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या नावाने कंपनीची नोंदणी केली आहे. कंपनी बंगळुरुत लक्झरी इलेक्ट्रिक कार्सची निर्मिती आणि विक्री करणार आहे. कंपनीने बंगळुरुत कामाला सुरुवातदेखील केली आहे.