टेस्लाचे भारतात आगमन झाले हो!!

टेस्लाचे भारतात आगमन झाले हो!!

टेस्लाने भारतात आपल्या उद्योगाला प्रारंभ केला आहे. ८ जानेवारी २०२१ रोजी टेस्लाने भारतात ‘टेस्ला इंडिया मोटर्स अँड एनर्जी’ या नावाने बंगळूरू येथे नोंदणी केली आहे. या नावाने कंपनी भारतात नक्की काय करणार आहे ते अजून स्पष्ट नाही. इलॉन मस्क यांनी गेल्याच वर्षी टेस्ला भारतात २०२१ पासून आपल्या गाड्यांची विक्री करायला प्रारंभ करेल असे सुतोवाच केले होते.

हे ही वाचा: भारतात धावणार टेस्ला गाड्या

पहा व्हिडीयो: भारतात येणार टेस्ला!

केंद्रीय ‘भूपृष्ठ वाहतूक व रस्ते महामार्ग मंत्री’ नितीन गडकरी यांनी देखील गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात या विधानाला पुष्टी दिली होती. नितीन गडकरी यांनी सांगितले होते, की कंपनी भारतात प्रथम गाड्यांच्या विक्रीस सुरूवात करेल. त्यानंतर त्यांनी मिळणाऱ्या प्रतिसादानुसार टेस्ला भारतात असेंब्ली आणि मग उत्पादन देखील सुरू करेल. इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मीतीसाठी प्रसिद्ध असलेली ही अमेरिकेन कंपनी भारतात बंगळूरू येथील एका वाहन अभियांत्रीकी क्षेत्रातील कंपनीसोबत संशोधन करण्याच्या कामात गुंतली आहे.

नुकतीच नोंदणी करण्यात आलेल्या या कंपनीचे तीन संचालक आहेत- वैभव तनेजा, वेंकटरंगम श्रीराम आणि डेव्हिड फाईन्टाईन. तनेजा हे कंपनीचे मुख्य लेखापाल आहेत तर फाईन्सस्टाईन ‘ग्लोबल ट्रेड अँड न्यु मार्केट’ या पदावर वरिष्ठ संचालक आहेत. श्रीराम यांच्या पदाबद्दल नेमकी माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. ते वाहनांचा अपघात झाल्यानंतर वाहनाला होणारे नुकसान मापन करणाऱ्या ‘क्लिअरकोट’ या ऍपचे सहनिर्माते आहेत.

टेस्ला इंडिया मोटर्स अँड एनर्जी या कंपनीने या प्रकल्पासाठी ₹१५ लाखांची तजवीज केली आहे. कंपनीने बंगळूरू येथील लॅव्हेल रोड येथे त्यांचे कार्यालय चालू केले आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. यदीयुरप्पा यांनी याबाबत ट्वीट केले होते, मात्र त्यांनी ते थोड्याच वेळात डिलीट केले. त्यामागचे कारण मात्र समजू शकले नाही.

कर्नाटक राज्याच्या औद्योगिक विभागाचे प्रधान सचिव गौरव गुप्ता यांच्यामते टेस्लाचे भारतातील आगमन देशाच्या विकासासाठी ऐतिहासीक घटना आहे.

Exit mobile version