टाटा नेक्सन (इव्ही)ची दमदार विक्री

टाटाची नेक्सन SUV ही इलेक्ट्रिक आणि डिझेल अशा दोन्ही प्रकारात उपलब्ध आहे. इलेक्ट्रिक वाहनं भारतात हळूहळू लोकप्रिय होत आहेत. इलेक्ट्रिक वाहनांशी निगडीत इतर व्यवस्थांची यंत्रणा देखील उभी राहात आहे. टाटांची नेक्सन लोकप्रिय कशी झाली याची कथा…

टाटा नेक्सन (इव्ही)ची दमदार विक्री

लवकरच टाटा मोटर्सच्या त्यांच्या पहिल्या इलेक्ट्रिक वाहन- ‘नेक्सन इव्ही’ची प्रथम वर्षपूर्ती साजरी करेल. पहिली भारतीय बनावटीची इलेक्ट्रिक गाडी म्हणून नेक्सनची इतिहासात गौरवशाली नोंद होईल. या गाडीने कोविड-१९च्या महामारीच्या काळातही उत्तम विक्री आलेख नोंदवला.

हे ही वाचा: भारतात धावणार टेस्ला गाड्या

या गाडीचे औपचारिक अनावरण २८ जानेवारी २०२० रोजी झाले होते. त्यानंतर या गाडीचा विक्री आलेख चढता राहिला आहे. विशेष म्हणजे वाहन खरेदीचा आधारस्तंभ असलेल्या घाऊक खरेदीदारांकडून ही खरेदी झालेली नसून, वैयक्तिक खरेदीतून या गाडीचा विक्री आलेख लिहीला गेला आहे. मोठ्या प्रमाणात होणारी गाड्यांची खरेदी (फ्लीट सेग्मेंट) कोविड महामारीमुळे थंडावली होती. 

कोविड १९ मुळे लागू झालेल्या लॉकडाऊनचा नकारात्मक परिणाम इलेक्ट्रिक वाहनांची सहकारी यंत्रणा उभी करण्यावर झाला. विशेषतः चार्जिंग केंद्रे उभी करण्याच्या कार्यात मोठा खंड पडला. त्याचबरोबर घाऊक खरेदीही बंद होती. मात्र तरीही टाटांची नेक्सन या आव्हानांना पुरून उरली. 

लॉकडाऊनमध्ये पहिल्या तिमाहीत नुकसान होऊन देखील एप्रिल- नोव्हेंबर २०२० या काळात जवळजवळ ३००० इलेक्ट्रिक गाड्यांची (२,९५९ नेमका आकडा) विक्री झाली आहे. या खरेदीपैकी सुमारे ८०-८५ टक्के खरेदी वैयक्तिक वापरकर्त्यांनी केलेली आहे. विकल्या गेलेल्या २,९५९ गाड्यांपैकी २,८०० गाड्या वैयक्तिक वापरकर्त्या ग्राहकांनी खरेदी केल्या आहेत. 

इलेक्ट्रिक वाहन उद्योगाच्या एकूण विक्रीपैकी ७० टक्के विक्री टाटा नेक्सन गाडीची आहे. या विक्रीशिवाय या उद्योगत सुमारे १५-२० टक्क्यांची घट नोंदली गेली असती. त्याचबरोबर मागील वर्षी झालेल्या सर्व इलेक्ट्रिक वाहनांच्या एकूण विक्रीपेक्षा नेक्सनची यावर्षी झालेली विक्री अधिक आहे. 

टाटाच्या प्रवासी वाहननिर्मीती विभागाचे प्रमुख, शैलेश चंद्रा यांच्या सांगण्यानुसार, इलेक्ट्रिक वाहन विक्रीला अडथळे ठरणाऱ्या सर्व मुद्द्यांवर केलेली मात, आणि टाटा समूहाच्या इतर कंपन्यांसोबत एकत्रितपणे काम केल्याचा फायदा झाला.

इलेक्ट्रिक वाहनांबाबत ग्राहकांच्या मनात तीन मोठ्या शंका असतात असे नुकत्याच प्रसिध्द झालेल्या एका अहवालातून उघड झाले आहे. एक, ग्राहकांना इलेक्ट्रिक वाहनांची किंमत नेहमीच्या वाहनांपेक्षा दुप्पट वाटते. दोन, जर गाडीचा पल्ला एका वेळेस २०० किमीपेक्षा कमी असेल तर त्या गाडीची खरेदी करण्यात ग्राहक फारशी उत्सुकता दाखवत नाहीत. तीन, काही वाहन चालकांना गाडी चालवताना थरार जाणवत नाही.

नेक्सनला या मर्यादांच्या पलिकडे नेण्याचं काम आम्ही १४-१६ महिन्यांच्या कालावधीत पूर्ण केल्याचं चंद्रा यांनी सांगितले. याशिवाय नेक्सन इलेक्ट्रिक गाडी, ही तिच्या डिझेल आवृत्तीपेक्षा केवळ एक-दीड लाखांनी महाग आहे. नेक्सनच्या मूळात आकर्षक रचनेचा फायदा झाल्याचे चंद्रा यांनी सांगितले.

Exit mobile version