गुंतवणूकदारांनी लुटले तेजीचे सोने

सेन्सेक्सची १,२७० अंकांची झेप

गुंतवणूकदारांनी लुटले तेजीचे सोने

विजयादशमीच्या एक दिवस आधी भारतीय शेअर बाजारात प्रचंड उत्साह दिसून आला. अमेरिकेच्या शेअर बाजारात आलेल्या तेजीचा आशियातील शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम झाला. मुंबई शेअर बाजारात झालेल्या जोरदार खरेदीमुळे सेन्सेक्सने १,२७० अंकांची झेप घेतली. निफ्टीनेही सुमारे ४०० अंकांची उसळी घेतली. त्यामुळे गुंतवणूकदारांनी बाजारात आलेल्या तेजीचे जोरदार सोने लुटले.

आज मंगळवारी सेन्सेक्स १२७६.६६ अंकांच्या वाढीसह ५८,०६५.४७ वर बंद झाला. निफ्टीमध्ये ३८७ अंकांची जबरदस्त झेप होती आणि तो १७,२७४. ३० वर बंद झाला. तेजीचा प्रमुख ठरलेला बँक निफ्टी निर्देशांक १०८०. ४५ अंकांनी वाढून ३९,११०. १०वर बंद झाला. शेअर बाजारात इंडसइंड बँक, बजाज फायनान्स, लार्सन अँड टुब्रो, स्टेट बँक ऑफ इंडिया, अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टाटा स्टील आणि बजाज फिनसर्व्ह यांच्या समभागांची चांगली खरेदी झाली.

सोमवारी घसरणीसह बंद झालेला बाजार आज जबरदस्त तेजीने उघडला आणि सेन्सेक्सने ५८ हजारांचा टप्पा ओलांडला. त्याच वेळी, निफ्टी देखील १७हजारांच्या वर आहे.सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक मोठ्या वाढीसह बंद झाले आहेत. आशियाई बाजारही आज सकारात्मक दिसले.

हे ही वाचा:

भारतीय हवाई दलाला मिळाली स्वदेशी ‘प्रचंड’ ताकद

दुर्गापूजा मंडपात आग लागून ५२ जण जखमी, तीन जणांचा मृत्यू

नवरात्र २०२२: तिबेटमधील शक्तीपीठ असलेली मनसा देवी

‘आदिपुरूष’ सिनेमाच्या टीझर रिलीजसाठी प्रभास, क्रिती पोहचले अयोध्येत

गुंतवणूकदारांना ५ लाख कोटी रुपयांचा फायदा

बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदारांना सुमारे५ लाख कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. बीएसईवर नोंदणी असलेल्या कंपन्यांचे बाजार भांडवल सुमारे ५ लाख कोटी रुपयांनी वाढून २७२.९३ लाख कोटी रुपये झाले आहे. व्यापक बाजारांमध्येही लक्षणीय वाढ दिसून आली. निफ्टी मिडकॅप १०० आणि निफ्टी स्मॉलकॅप १०० मध्ये एक टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली.

सोन्या-चांदीतही वाढ 

दुसरीकडे सोन्या-चांदीतही वाढ झाली. आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ५१,२८६ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाला. चांदीबद्दल बोलायचे झाले तर ते प्रति किलो ६१,०३४ रुपयांवर गेले आहे. आज डॉलरच्या तुलनेत रुपया ३० पैशांनी मजबूत झाला आहे.

Exit mobile version