जागतिक तापमानवाढ आणि त्यामुळे होत असलेले वातावरण बदल ही जगासमोरची मोठी समस्या आहे. वातावरणातील बदलामुळे तलावांचे आकारमान घटत आहे. एकीकडे तापमान वाढ, पाण्याची मागणी वाढत असताना दुसरीकडे जलसाठे घटत जाणे हे धोक्याचे आहे.
तापमानवाढीमुळे समुद्राच्या पातळीत होणाऱ्या वाढीबद्दल जग चिंताक्रांत आहे मात्र तलावाच्या पाण्याच्या पातळीत होणारी घट ही सुध्दा तितकीच चिंताजनक आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे.
“कॅस्पियन समुद्राला जगातील तलावांचे प्रातिनिधीक उदाहरण म्हणून घेता येईल. जगातिल कित्येकांना तापमानवाढीमुळे तलावांच्या पातळीत होत असलेली घट माहित देखील नाही.” असे माट्टीहास प्रांज यांनी सांगितले आहे. ‘इंटरगव्हर्मेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज’ (आय.पी.सी.सी)च्या अहवालात देखील तलावातील पाण्यात घट होत असल्याचा उल्लेख नाही.
कॅस्पियन समुद्र कुठल्याही इतर समुद्राला जोडलेला नाही. त्या समुद्रासाठी पाऊस आणि व्होल्गा नदी हे दोनच पाण्याचे स्त्रोत आहेत. वाढत्या तापमानवाढीमुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे, त्यामुळे हा समुद्र आक्रसत आहे. कॅस्पियन समुद्राचे अस्तित्व त्या भागाच्या पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्यामुळे अभ्यासकांच्या मते, जमिनीवरील पाण्याच्या साठ्यांचे संवर्धन करणे आवश्यक आहे.