रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक असणाऱ्या सतीश मराठे यांची आता नॅशनल हाऊसिंग बँकच्या बोर्डावर नियुक्ती करण्यात आली आहे. आरबीआयने काढलेल्या नवीन अधिसुचनेद्वारे ही नियुक्ती करण्यात आली आहे. सतीश मराठे यांना बँकिंग क्षेत्रात काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. ‘सहकार भारती’ या सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेचे ते संस्थापक सदस्य आहेत.
नॅशनल हाऊसिंग बँक ही हाऊसिंग क्षेत्राशी संबंधित शीर्ष वित्तीय संस्था आहे. हाऊसिंग क्षेत्राला चालना देण्याच्या उद्दिष्टाने १९८७ सालच्या नॅशनल हौसिंग बँक कायद्या अंतर्गत नॅशनल हाऊसिंग बँकेची स्थापना करण्यात आली. ९ जुलै १९८८ रोजी ही बँक अस्तित्वात आली. याच बँकेच्या केंद्रीय बोर्डावर आता सतीश मराठे कार्यरत असणार आहेत.
हे ही वाचा:
जिलेटिनची कांडी आणि ऑक्सिजनची नळकांडी
बीडमध्ये कोरोनाचा हाहाकार, सत्ताधारी मात्र गायब
उत्तर प्रदेशातही दर रविवारी टाळेबंदी
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री रडत लक्ष्मी
कोण आहेत सतीश मराठे?
सतीश मराठे हे बँकिंग क्षेत्रातले आणि सहकार क्षेत्रातले एक मोठे नाव आहे. वाणिज्य, विधी शाखेची त्यांनी पदवी संपादन केली आहे. तर पत्रकारितेत पदविका पूर्ण करताना त्यांनी सुवर्णपदक पटकावले आहे. त्यांनी बँकिंग क्षेत्रात कामाला सुरवात केल्यानंतर अनेक बँकांच्या विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्यांनी १९९१ ते २००१ या कालावधीत जनकल्याण सहकारी बँकेचे सीईओ म्हणून काम पाहिले आहे. तर २००२ ते २००६ या कालावधीत ते युनाइटेड वेस्टर्न बँकेचे सीईओ आणि अध्यक्ष होते.
या व्यतिरिक्त ते ‘सहकार भारती’ या सहकार क्षेत्रातील देशव्यापी स्वयंसेवी संघटनेचे संस्थापक सदस्य आहेत. तर सेंटर फॉर स्टडीज अँड रिसर्च इन कोऑपरेशनचे संस्थापक संचालक आहेत.