भारतात सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. विशेषत: दिवाळीत धनत्रयोदशी आणि अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याची विक्री वाढते. पण, यंदा अक्षय्य तृतीयेला सोन्याची विक्री फिकी पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या काही महिन्यात १० ग्रॅम सोन्याचा भाव जवळपास ६० हजार रुपयांच्यावर गेल्याचा परिणाम सोन्याच्या खरेदीवर होण्याची शक्यता आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने आणि सोन्यापासून बनवलेल्या दागिन्यांच्या विक्रीत सुमारे ३०टक्क्यांनी घट होण्याची शक्यता ज्वेलर्सनी व्यक्त केली आहे.
अक्षय्य तृतीयेला सोन्याचे दागिने आणि नाणी खरेदी करणे शुभ मानले जाते. या दिवशी लोक त्यांच्या क्षमतेनुसार छोटे-मोठे दागिने किंवा नाणी खरेदी करण्याचा प्रयत्न करतात, परंतु यावेळी गेल्या चार महिन्यांत सोन्याच्या किमतीत झालेली वाढ त्यांची निराशा करू शकते असे मत सराफा बाजारातील जाणकारांनी व्यक्त केले आहे.
ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी कौन्सिलचे अध्यक्ष सन्यम मेहरा यांच्या म्हणण्यानुसार अलीकडेच १० ग्रॅम सोन्याचा भाव ६०,००० रुपायंवर गेल्याने ग्राहकांचा मोठा वर्ग घाबरला आहे काही दिवसांपासून भाव थोडे कमी झाले असले तरी ते अजूनही चढेच आहेत. याचा परिणाम अक्षय्य तृतीयेच्या विक्रीवर होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत विक्री २० टक्क्यांनी कमी होऊ शकते असा अंदाज मेहरा यांनी व्यक्त केला. जागतिक सुवर्ण परिषदेचे प्रादेशिक मुख्य कार्यकारी अधिकारी सोमसुंदरम पीआर म्हणाले की, अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने सोन्याची खरेदी हा करोडो भारतीयांच्या उत्सवाचा अत्यावश्यक भाग आहे. अशा स्थितीत भावात चांगली घसरण झाली तर विक्रीत तेजी येऊ शकते.
अनिश्चिततेमुळे सोन्यावर अधिक विश्वास
पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.सौरभ गाडगीळ म्हणाले यावर्षी अक्षय्य तृतीया शनिवारी असल्यामुळे ग्राहकांची अधिक गर्दी अपेक्षित आहे.यावर्षी देखील अक्षय्य तृतीया अलंकार उद्योगासाठी सकारात्मक असेल. सोन्याच्या किंमती ६०,००० रुपये प्रति तोळाच्या आसपास स्थिरावतील अशी अपेक्षा आहे.यामुळे सोने आणि चांदीच्या विक्रीला चालना मिळेल.जागतिक अनिश्चितता अधिक वाढत चालली असल्याने सोन्यावरचा विश्वास अधिक दृढ होईल.पुढील वर्षात सोन्याच्या किमती वाढत राहतील अशी अपेक्षा आहे. गुढी पाडव्याप्रमाणेच अक्षय्य तृतीयेला देखील चांगला व्यवसाय होईल.
विक्रीत १० टक्के वाढ अपेक्षित
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी यावर्षी तरूण वर्ग व पहिल्यांदा खरेदी करणारा वर्ग मोठ्या प्रमाणावर असेल अशी अपेक्षा आहे.गुंतवणूक तसेच विविध समारंभांसाठी परिधान करायचे दागिने यासाठी ग्राहक सोने तसेच दागिने खरेदी करत आहेत.विक्री प्रमाणाचा विचार करता गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी १० टक्के वाढ अपेक्षित असून मूल्याच्या बाबतीत ३५ ते ४० टक्के वाढ होईल अशी अपेक्षा आहे. देशभरात ३० टन दागिन्यांची विक्री होते, ज्यापैकी महाराष्ट्राचा वाटा तब्बल १२ टन आहे. यावर्षी विक्री प्रमाणात १० टक्के वाढ अपेक्षित असल्याने हा वाटा १२ ते १४ टन पर्यंत जाईल व त्यापैकी ५० टक्के हा मुंबई आणि पुण्याचा असेल असेही गाडगीळ यांनी सांगितले.
हे ही वाचा:
राजकीय पक्षांवर लक्ष ठेवा नाही तर देश लुटला जाईल!
पाठीच्या कण्याच्या मदतीने त्याने खेचले तब्बल १,२९४ किलो वजनाचे वाहन
दिल्लीच्या साकेत न्यायालयात थरार, महिलेवर वकिलानेच झाडल्या गोळ्या
पायलटने चक्क मैत्रिणीला कॉकपिटमध्ये बोलावले, चौकशी सुरू
सोने वधारले
अक्षय्य तृतीयेच्या फक्त एक दिवसअगोदर सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. आज मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा प्रति १० ग्रॅमचा भाव २२० रुपयाने वाढला आहे. त्यामुळे २४ कॅरेट सोन्यासाठी प्रति १० ग्रॅम ६१ हजार १५० रुपये मोजावे लागतील. शुक्रवारी २२० रुपयांनी कमी झालेले दर २२० रुपयांनी वाढल्याने सोन्याचा दर पूर्ववत झालाय. २२ कॅरेट सोन्याच्या भावात २०० रुपयांची वाढ झाल्याने सोन्याचा प्रति १०ग्रॅम भाव ५६ हजार ५० रुपये झाला आहे. शुक्रवारी हा भाव ५६ हजार ८५० रुपये एवढा होता.