भाज्यांचे तसेच कडधान्यांच्या किंमतीत घट झाल्यामुळे मे महिन्यात किरकोळ महागाईचा दर नीचांकी ४.२५ टक्क्यांवर नोंदवला गेला. महागाई दरात घसरणीचा हा क्रम सलग चौथ्या महिन्यात कायम राहिला. रिझर्व्ह बँकेसाठी सहनशील मर्यादा पातळी सहा टक्क्यांखाली नोंदवली जाण्याचा हा सलग तिसरा महिना आहे.
ग्राहक किंमत निर्देशांकांवर आधारित महागाई दर आधीच्या एप्रिल महिन्यात ४.७ टक्के पातळीवर होता, तर गेल्या वर्षी म्हणजे मे २०२२मध्ये तो ७.०४ टक्के अशा चिंताजनक पातळीवर होता. एप्रिल २०२१मध्ये नोंदवल्या गेलेल्या ४.२३ टक्क्यांच्या महागाई दरानंतर नोंदवला गेलेला हा सर्वांत कमी दर आहे. यापूर्वी सप्टेंबर २०१९मध्ये महागाई दर चार टक्क्यांच्या खाली नोंदवला गेला होता.
अन्नधान्यांच्या किमतीत घट झाल्याचा परिणाम मे महिन्याच्या एकंदर महागाई दरातील घसरणीत दिसून आला. एप्रिलमध्ये ३.८४ टक्के नोंदवलेली अन्नधान्यांच्या किमतीतील वाढ मे महिन्यात २.९१ टक्क्यांवर घसरली. ग्राहक किंमत निर्देशांकात जवळपास निम्मा वाटा हा अन्नधान्य घटकाचा आहे. इंधन आणि विजेचा महागाई दरही एप्रिलमधील ५.५२ टक्क्यांवरून मागील महिन्यात ४.६४ टक्क्यांवर आला.
हे ही वाचा:
आनंद महिंद्रांनी नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
‘बिपरजॉय’मुळे ६७ रेल्वे गाड्या रद्द!
जी- २० परिषदेसाठी आलेले परदेशी पाहुणे वारीत दंग
मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे मिळणार
एल-निनोमुळे परिणाम होण्याची शक्यता असतानाही यंदा पाऊसपाणी सामान्य राहिल्यास महागाई दराच्या घसरणीचा क्रम टिकून राहील आणि नजीकच्या काळात व्याजदर कपातही दिसून येईल, असे अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे. चलनवाढ कमी झाल्यामुळे अर्थव्यवस्थेला दिलासा मिळाला आहे.