गेल्या दोन वर्षांपासून दिवाळीच्या खरेदीवर बंधन आली होती आणि त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर दिसून येत होता. मात्र यंदा निर्बंधात शिथिलता असल्याने यावर्षीच्या दिवाळीसाठी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याने देशभरात मालाची विक्रमी विक्री झाली आहे. गेल्या १० वर्षांचा विक्रम मोडीत काढत १ लाख २५ हजार कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे वृत्त ‘सकाळ’ने दिले आहे.
राजधानी दिल्लीत सुमारे २५ हजार कोटींचा व्यवसाय झाला आहे, अशी माहिती कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे (सीएआयटी) राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भारतीया आणि सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी दिली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून आर्थिक अडचणींमुळे दिवाळीच्या खरेदीत मंदी आली होती, त्यामुळे बाजारपेठेतही खरेदी थंडावली होती. पण यावर्षीच्या आकडेवारीने दिवाळीच्या दिवशी गेल्या १० वर्षांतील विक्रीचा विक्रम मोडला आहे. पारंपारिक वस्तू म्हणजेच मातीचे दिवे, कागदी दिवे, मेणबत्त्याआदी वस्तूंना बाजारात जास्त मागणी असल्यामुळे भारतीय कारागिरांचा चांगला व्यापार झाला. तसेच गृह सजावटीच्या वस्तू, मिठाई, ड्रायफ्रूट्स, कपडे आदी उत्पादनांची मागणीही मोठ्या प्रमाणात होती.
हे ही वाचा:
अनिल देशमुखांना १२ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी
ड्रग्स प्रकरणात होणार अस्लम शेख यांची चौकशी?
भारत पाक युद्धातील माजी सैनिकाचा नांदेडमध्ये खून
व्यापारी वर्ग आता १४ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या लग्नाच्या हंगामासाठी तयार झाले आहेत. तसेच यंदा दिवाळीत नागरिकांनी स्वदेशी वस्तू खरेदीवर भर दिल्याने चीनचे सुमारे ५० हजार कोटींचे नुकसान झाले आहे, असा दावा भारतीया व खंडेलवाल यांनी केला आहे.
पुण्यात गेले दीड वर्ष कोरोनामुळे बाजारपेठ ठप्प होती; परंतु या वर्षी ग्राहकांनी स्थानिक बाजारपेठेतील खरेदीला प्राधान्य दिले, त्यामुळे सर्व व्यापारी वर्गाला ही दिवाळी नवसंजीवनी देणारी ठरली आहे. यंदा घरगुती व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे, असे पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी सांगितले.