वर्षाअखेरीस वस्तू आणि सेवा कराच्या माध्यमातून आजवरचे सर्वाधिक कलेक्शन झाले आहे. ‘वस्तू आणि सेवा कर’ या नव्या कायद्याची अंमलबजावणी सुरु झाल्यापासूनचे हे सर्वाधिक मासिक कलेक्शन आहे. डिसेंबर महिन्यात जीएसटीचे कलेक्शन १ लाख १५ हजार १७४ कोटी इतके झाले आहे. पहिल्यांदाच भारताचे मासिक जीएसटी कलेक्शन १.१५ लाख कोटींपेक्षा अधिक झाले आहे.
डिसेंबर २०१९ च्या तुलनेत डिसेंबर २०२० चे जीएसटी उत्पन्न १२ टक्क्यांनी अधिक आहे. डिसेंबर महिन्याच्या कलेक्शनमुळे सलग तिसऱ्यांदा जीएसटीचे मासिक कलेक्शन १ लाख कोटींपेक्षा अधिक झाले आहे. यापुर्वी जीएसटीचे सर्वाधिक कलेक्शन एप्रिल २०१९ मध्ये झाले होते, जे १ लाख १३ हजार ८६६ कोटी इतके होते.
“डिसेंबर २०२० मध्ये जीएसटी रेव्हेन्यू हा जीएसटीच्या अंमलबजावणीपासूनचा सर्वाधीक रेव्हेन्यू असून पहिल्यांदाच आपण १.१५ लाख कोटीचा टप्पा पार केला आहे. या आधी सर्वाधिक जीएसटी कलेक्शन एप्रिल २०१९ मध्ये १,१३,८६६ कोटी होते. सामान्यतः एप्रिल महिन्यातला रेव्हेन्यू हा जास्तच असतो कारण आर्थिक वर्षाच्या शेवटी मार्च मधल्या रिटर्न्सचे प्रमाण जास्त असते” असे अर्थमंत्रालयाने सांगितले आहे.
अर्थ मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, “पँडेमिक नंतर जीएसटी कलेक्शनमध्ये झालेली वाढ हे सुधारणारी अर्थव्यवस्था आणि देशभरातील करबुडव्यांविरोधात केलेल्या कारवाईचा एकत्रित परिणाम आहे.”
जीएसटीच्या १,१५,१७४ कोटी कलेक्शन पैकी सीजीएसटीच्या माध्यमातून २१,३६५ कोटी मिळाले आहेत. तर एसजीएसटीचे कलेक्शन २७,८०४ कोटी आहे. जीएसटीच्या कलेक्शनची आकडेवारी ५७,४२६ कोटी असून सेसचे उत्पन्न ८,५३९ कोटी आहे.