गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या जानेवारी महिन्यातील निर्यातीत वाढ झाली आहे. फार्मा आणि इंजिनियरिंग क्षेत्रातील उत्तम वाढीमुळे गेल्या महिन्यातील निर्यात ५.३७ टक्क्यांनी वाढली आहे. जानेवारी २०२१ मध्ये $२७.२४ बिलीयन इतके उत्पन्न निर्यातीतून प्राप्त झाले आहे.
जानेवारी महिन्यात झालेल्या या वाढीमुळे, देशाच्या निर्यात तुटीत घट झाली आहे. जानेवारी २०२० मध्ये $१५.३ बिलीयन असलेली तुट $१४.७५ बिलीयन पर्यंत घसरली आहे. डिसेंबर २०२० मध्ये हीच तुट $१५.४४ बिलीयन इतकी होती.
फार्मा क्षेत्रात गेल्या महिन्यात १६.४ टक्क्यांची वाढ नोंदली गेली तर इंजिनियरींग क्षेत्रात ही वाढ १९ टक्के इतकी होती.
या दोन क्षेत्रांबरोबरच इतर क्षेत्रांतही मोठ्या प्रमाणात निर्यातीत वाढ झाली आहे. यात तेलबिया, लोह खनिज, तंबाखू, तांदूळ, फळे आणि भाज्या, कार्पेट, हस्तकलेच्या वस्तु, मसाले, सिरामिक उत्पादने आणि काचेच्या वस्तु, चहा, काजू, प्लॅस्टिक आणि रसायने यांची देखील मोठ्या प्रमाणात निर्यात करण्यात आली.
या क्षेत्रांच्या निर्यातीत वाढ नोंदली गेली, तर पेट्रोलियम उत्पादने, कापड उत्पादने, चामड्याच्या वस्तु यांच्या निर्यातीत घट झाली आहे. डिसेंबर २०२० मध्ये देखील या क्षेत्राचा एकूण निर्यातीतील वाटा केवळ ०.१४ टक्के राहिला आहे.