राहुल बजाज ‘बजाज ऑटोच्या’ पदावरून पायउतार

राहुल बजाज ‘बजाज ऑटोच्या’ पदावरून पायउतार

देशातील वाहन उद्योगात बाजाज उद्योग आघाडीचे राहिले आहेत. या कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यापुढे ते कंपनीसाठी सल्लागार म्हणून कार्यरत राहणार आहेत.

राहुल बजाज यांनी वयाचे कारण देत अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. वाहन उद्योगातील आघाडीची उत्पादक असलेल्या पुण्यातील बजाज ऑटो या कंपनीचे नेतृत्व १९७२ पासून राहुल बजाज अध्यक्षपदावरून करत होते. ते पायउतार झाल्यानंतर १ मे २०२१ पासून राहुल बजाज ‘मानद अध्यक्ष’ म्हणून धुरा सांभाळणार असल्याचे ‘बजाज ऑटो’ने म्हटलं आहे.

बजाज ऑटो’मध्ये आज वरिष्ठ पातळीवर बदल झाले. सध्याचे ‘बजाज ऑटो’चे संचालक नीरज बजाज यांच्याकडे बिगर कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. या बदलांतच राहुल बजाज यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. ते १ मे २०२१ पासून ‘बजाज ऑटो’चे मानद अध्यक्ष राहतील.

हे ही वाचा:

सुमारे ८५ हजार तरुणांचे पहिल्याच दिवसात लसीकरण

तामिळनाडूत सत्ताबदलाचे वारे?

फडणवीसांवरची आक्षेपार्ह टिप्पणी पडली महागात

बेळगावात भाजपा पुढे

राहुल बजाज यांचा प्रदीर्घ अनुभव, ज्ञान, दूरदृष्टी आणि कंपनीमधील त्यांची आवड लक्षात घेता ते यापुढे मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहतील. संचालक मंडळाने राहुल बजाज यांना पुढील पाच वर्षांसाठी ‘बजाज ऑटो’चे मानद अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला असल्याचे कंपनीने शेअर बाजाराला कळवले आहे. गेल्या पाच दशकांमध्ये बजाज समूहाला नावारूपाला आणण्यात राहुल बजाज यांनी प्रचंड योगदान दिले आहे.

१० जून १९३८ साली जन्म झालेल्या राहुल बजाज यांचे अर्थशास्त्र आणि विधीमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आहे. त्यांनी हॉवर्ड विद्यापीठातून ‘एमबीए’चे शिक्षण घेतले आहे. १९६८ मध्ये राहुल बजाज हे मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर बजाज ऑटोमध्ये रुजू झाले होते. १९७२ मध्ये त्यांनी ‘बजाज ऑटो’ची सूत्रे हाती घेतली. बजाज उद्योग समूहाला वाहन उद्योगात नावारूपाला आणण्यात राहुल बजाज यांचे मोठे योगदान आहे. २००१ मध्ये राहुल बजाज यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Exit mobile version