कोरोना काळानंतर आर्थिक चक्र पूर्वपदावर येत असतानाच आगामी २०२२ साल हे पगारदारांसाठी शुभ ठरू शकेल. मागील दोन वर्षांची भरपाई करत सरासरी १० टक्क्यांची वेतनवाढ पगारदार मिळवू शकतील. शिथिलतेनंतर उद्योगांमध्ये चांगली गुणवत्ता आणि प्रतिभेला सामावून घेण्यासाठी कंपन्यांमध्ये सुरू असलेली स्पर्धा पाहता, त्यांच्याकडून मोबदला वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कोरोनामुळे कंपन्यांमध्ये डिजिटल माध्यमातून काम करण्यावर जास्त भर दिला जात आहे. त्यामुळे या क्षेत्रातील कौशल्य असलेल्या तरुणांना आकर्षित करण्यासाठी कंपन्यांनी पगाराच्या अंदाजपत्रकात वाढ केली आहे.
कंपन्या अर्थव्यवस्थेचा आढावा घेऊन कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा प्रस्ताव विचारात घेत असतात. त्यानुसार २०२२ मध्ये सरासरी ९.४ टक्के पगारवाढ अपेक्षित आहे, असा ‘एऑन’च्या वार्षिक वेतनवाढ सर्वेक्षणाचा निष्कर्ष आहे. या सर्वेक्षणानुसार अर्थव्यवस्थेला मिळालेली चालना, ग्राहकांची बदललेली सकारात्मक मानसिकता आणि कौशल्य आधारित तरुणांसाठी कंपन्यांमध्ये वाढलेली स्पर्धा यामुळे २०२२ मध्ये पगारामध्ये सरासरी ९.४ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा:
ममतांचा पुन्हा पराभव करायला भाजपाकडून ‘या’ महिलेला उमेदवारी
मालमत्ता खरेदी लोक चालले दक्षिण मुंबईला!
जागा हडप करण्यासाठी वाजवले जातात फटाके…
कोपर पुलावर आता ढोपर फुटण्याची भीती
तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सर्वाधिक ११.२ टक्के सरासरी वाढ मिळण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी या क्षेत्रात १०.५ टक्के वेतनवाढ मिळाली होती. वाणिज्य सेवा आणि ई- कॉमर्स क्षेत्रात गेल्या वर्षी १०.१ टक्के वेतनवाढ मिळाली होती; तर यंदाच्या वर्षी १०.६ टक्के वेतनवाढ मिळण्याची शक्यता आहे. माहिती तंत्रज्ञान, वैद्यकीय क्षेत्र आणि ग्राहकोपयोगी उत्पादने क्षेत्रात ९.२ ते ९.६ टक्के वेतन वाढ मिळू शकते.
कोरोना काळानंतर गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात ८.२ टक्के वेतनवाढ अपेक्षित आहे. त्याचप्रामाणे कोरोना काळात सर्वाधिक आर्थिक फटका बसलेल्या हॉटेल क्षेत्रात ७.९ टक्के वेतनवाढ मिळू शकते. सर्वेक्षणानुसार २०२२ मध्ये उर्जा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीची स्थिती नकारात्मक राहण्याची शक्यता आहे.