भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोटार उत्पादकांना एक मोलाचा सल्ला दिला आहे. ‘सियाम’ या उद्योग संस्थेच्या वार्षिक अधिवेशनात पंतप्रधान बोलत होते. सध्याच्या काळात मोटार उत्पादकांनी कोणत्या बाबी लक्षात ठेवाव्यात यासाठी पंतप्रधानांना त्यांना लक्ष घालण्याची सूचना केली.
मोटार उत्पादनाच्या क्षेत्रात वाढ होत असल्याने ऑटो कंपन्यांनी टिकाऊपणा आणि पर्यावरणावर लक्ष केंद्रित करावे, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
‘टिकाऊ आणि पर्यावरणाशी सुसंगत अशी गतिशीलता इकोसिस्टीम विकसित करणे, ही आजच्या काळाची गरज आहे. पर्यावरणपूरक आणि आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य गतिशीलता हे भविष्य आहे,’ असे वक्तव्य पंतप्रधान मोदी यांनी ‘सियाम’ या उद्योग संस्थेच्या वार्षिक अधिवेशनात केले. पंतप्रधानांचा संदेश ‘सियाम’चे अध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी वाचून दाखवला.
‘ऑटो उद्योगाने कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी विविध तंत्रज्ञानाकडे लक्ष दिले पाहिजे. पॉवरट्रेन तंत्रज्ञानाच्या विस्तृत श्रेणीसह वाहने सादर करून डी-कार्बोनायझेशन करण्याच्या दिशेने भारतीय वाहन उद्योगाचे प्रयत्न उल्लेखनीय आहेत.
आपल्याकडे इथेनॉल, फ्लेक्स-इंधन, सीएनजी, बायो-सीएनजी, हायब्रीड इलेक्ट्रिक, इलेक्ट्रिक आणि हायड्रोजन यांसारख्या अनेक पर्यायी तंत्रज्ञानावर चालणारी वाहने आहेत. कार्बन उत्सर्जन आणि आपल्या देशाचे तेल आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी असे एकत्रित प्रयत्न सुरू ठेवण्याची आणि वाढवण्याची गरज आहे,” असे मोदी म्हणाले.
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदींच्या ‘मेक इन इंडिया’ धोरणाची पुतीन यांना भुरळ
जवानाचे रक्षण करताना सहावर्षीय लष्करी कुत्र्याचा मृत्यू
उद्धव ठाकरे हे केवळ मनोरंजन करणारे ‘विदूषक’ !
भारत आशिया चषकाच्या अंतिम फेरीत
जेव्हा भारताच्या स्वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण होतील, त्या वेळी म्हणजेच सन २०४७ ही वेळ भारत हा एक मजबूत, शाश्वत, स्वावलंबी आणि विकसित भारत निर्माण होण्यासाठी एक योग्य वेळ असेल, अशीही आशा त्यांनी व्यक्त केली. तसेच, संमेलनातील उद्योगतज्ज्ञ आणि प्रमुख भागधारकांमधील चर्चेतून ‘अमृत काल’ची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आणि ऑटोमोबाईल उद्योगासाठी मार्ग काढण्यास मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी वाणिज्य आणि उद्योग पीयूष गोयल यांनी वाहन उद्योगाला आयातीवरील आपले अवलंबित्व कमी करून स्थानिक बाजारातच या वस्तूंचे उत्पादन कसे होईल, याकडे लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. उत्पादनांचे स्थानिकीकरण लवकरात लवकर कसे होईल, याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.