भारतीय हवाई वाहतूक कंपन्या नवीन विमानांच्या खरेदीच्या ऑर्डर देत असताना प्रत्येक कंपन्यांमधील स्पर्धा वाढणार आहे. त्यामुळे चांगले वैमानिक स्वत:च्या ताफ्यात ठेवण्याकडे या कंपन्यांचा कल वाढू लागला असून देशातील नवीन हवाई वाहतूक कंपनी ‘आकासा एअर’ने त्यांच्या वैमानिकांच्या वेतनात ४० टक्के वाढ केली आहे.
हवाई वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, ही वाढ अन्य कंपन्याही करतील. त्यांच्या ताफ्यात नव्या विमानांसह चांगल्या वैमानिकांचा ताफाही आहे, हे दाखवण्यासाठी आणि चांगल्या वैमानिकांना आपल्या ताफ्यात ठेवण्यासाठी अन्य कंपन्याही हेच अनुकरण करतील, असे भाकीत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तवले आहे. आखाती देशांमधील एमिरात्स, कतार एअरवेज आणि रियाध एअर या विमान कंपन्याही वेतनवाढ करणार असून त्यांचीही वेगाने विस्तार करण्याची योजना आहे.
हे ही वाचा:
दीर्घ प्रतीक्षेनंतर मुंबईत पावसाचे आगमन
रशियात अंतर्गत बंडखोरी, सत्तापालट होणार?
गोरेगावच्या यशोधाम शाळेत १४ वर्षीय मुलाचा तरण तलावात बुडून मृत्यू
पाटण्याच्या पर्यटनाची फलनिष्पत्ती फक्त ठाकरेंना
करोनाकाळात जगभरातील हवाई वाहतूक कंपन्यांना फटका बसला होता. त्यामुळे अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या होत्या आणि त्यांच्या वेतनाही कपात करण्यात आली होती. आता मात्र परिस्थितीमध्ये हळुहळू सुधारणा होत आहे. टाटा कंपनीच्या मालकीच्या असणाऱ्या एअर इंडिया कंपनीने एप्रिलमध्ये २० टक्के पगारवाढ केली होती आणि करीअरमध्ये वेगाने प्रगती होईल, असे आश्वासनही कर्मचाऱ्यांना दिले होते. ही कंपनी लवकरच ४७० विमानांची खरेदी करणार असून त्यासाठी त्यांना मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे.
‘स्पाइसजेट’ कंपनीनेही मे महिन्यात वैमानिकांची पगारवाढ केली होती. ‘आकासा’मधील ज्येष्ठ वैमानिकांना दर महिन्याला पाच लाख ७५ हजारांपासून वेतन मिळते. तर, सीनिअर फर्स्ट ऑफिसर्सना दोन लाख ७५ हजारांपासून वेतन मिळते. जुलै महिन्यापासून ज्येष्ठ वैमानिकांना सहा लाख २५ हजार रुपयांपासून वेतन मिळेल तर, सीनिअर फर्स्ट ऑफिसरना तीन लाख ४० रुपयांपासून वेतन मिळेल. अनुभव आणि ताशी उड्डाणाच्या अनुभवावरून हे वेतन आणखी वाढू शकते.
दर महिन्याला कमाल ६० तासांचे उड्डाण केल्यास वैमानिकाचा पगार सात लाख ७५ हजारांपर्यंत जाऊ शकतो. जो आता सात लाख २८ हजार आहे. ‘कनिष्ठ वैमानिकांचा पगार हा अधिक आहे. कारण ते हवाई वाहतूक कंपन्यांचे भविष्य आहेत. त्यामुळे या कंपन्यांना त्यांना धरून ठेवायचे आहे,’ असे या क्षेत्रातील एका तज्ज्ञाने सांगितले. ‘बोइंग ७३७च्या वैमानिकांना या क्षेत्रातील सर्वाधिक वेतन मिळते आहे,’ असे ते म्हणाले.
आकासा एअरलाइन वैमानिकांच्या कामाचे तासही ४० ऐवजी ४५ करणार आहे. त्यामुळे वैमानिक ४५ तासांचे वेतन कमवू शकेल. वैमानिकाला अधिकच्या प्रत्येक तासासाठी कॅप्टनला सात हजार ५०० तर फर्स्ट ऑफिसरला तीन हजार ४५ रुपये मिळतील. ‘कंपनीकडे सध्या १९ बोइंग ७३७ मॅक्स विमाने असून मार्च २०२४पर्यंत ताफ्यात आणखी १० विमाने दाखल होतील,’ अशी माहिती आकासा एअरचे सीईओ विनय दुबे यांनी दिली.