सध्या श्रीलंका गंभीर आर्थिक संकटातून वाटचाल करत आहे. किंबहुना, श्रीलंका सध्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. श्रीलंकेत सध्या दैनंदिन खाद्यपदार्थांच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. एका महिन्यात खाद्यपदार्थ १५ टक्क्यांनी महागले आहेत. श्रीलंकेत सध्या भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत.
भाज्यांच्या वाढत्या किमतीमुळे श्रीलंकेत जनजीवन विस्कळीत झाले आहे. सुमारे २२ दशलक्ष लोकसंख्या असलेला, श्रीलंका सध्या त्याच्या इतिहासातील सर्वात मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. नोव्हेंबरच्या अखेरीस, त्याच्या परकीय चलनाचा साठा सुमारे १.६ अब्ज डॉलर्सवर घसरला होता, जो काही आठवड्यांच्या आयातीसाठी पुरेसा होता. फक्त १०० ग्रॅम मिरचीचा भाव १०० रुपयांवर गेला आहे. एका महिन्यात मिरचीचे भाव २५० टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. माहितीनुसार, वांगी १६० रुपये किलो, भेंडी २०० रुपये किलो, टोमॅटो २०० रुपये किलो, कोबी २४० रुपये किलो, फरसबी ३२० रुपये किलो दराने विकली जात आहे.
श्रीलंकेत अन्न आणि जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे आणि जीवनावश्यक वस्तू महाग झाल्या आहेत. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली असून, त्यांना पोटभर अन्न देखील मिळत नाही आहे. श्रीलंकेत एलपीजी सिलिंडरची किंमत गेल्या चार महिन्यांत सुमारे ८५ टक्क्यांनी वाढली आहे.
हे ही वाचा:
सराव न करताच खेळा मिनी ऑलिम्पिक!
बीडची लेडी सिंघम ठरली ‘मिस महाराष्ट्र’
…आणि काडीपेटीची झाली साडीपेटी!
श्रीलंका आपल्या अन्न आयातीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे परंतु सध्या परकीय चलनाच्या कमतरतेचा सामना करत आहे. ज्याचा थेट परिणाम त्याच्या मूलभूत गरजांवर होत आहे. कोविड काळापासून श्रीलंकेतील पाच लाख लोक दारिद्र्यरेषेखाली गेले आहेत. तज्ञांचे म्हणणे आहे की २०१९ मध्ये श्रीलंकेने पर्यटनातून सुमारे ४ अब्ज डॉलरची कमाई केली होती. परंतु, जागतिक महामारीमुळे अर्थव्यवस्था कमकुवत झाली आहे.