भारताने निर्यात क्षेत्रात नाव उंचावण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. ‘आत्मनिर्भर भारत’ या योजनेअंतर्गत उद्योग मंत्रालयाच्या वतीने ‘वन डिस्ट्रिक्ट, वन प्रॉडक्ट’ (एक जिल्हा, एक उत्पादन) हा नवीन उपक्रम हाती घेतला होता. या उपक्रमानुसार विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उत्पादित होणाऱ्या शेती किंवा औद्योगिक उत्पादनांना जागतिक पातळीवर ओळख मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने प्रयत्न केले जाणार आहेत. भारताने आता आपल्या पारंपरिक उत्पादनांसोबतच देशातील अजून काही नवीन उत्पादनांची नावे या यादीत समाविष्ट केली आहेत.
पूर्वी भारत फक्त गोव्याचा काजू, गुंटूरची मिरची अशा काही उत्पादनांची निर्यात कशी जास्त होईल याकडे लक्ष देत असे. मात्र आता ‘वन डिस्ट्रिक्ट, वन प्रॉडक्ट’ या उपक्रमामुळे भारतातील इतर उत्पादनांच्या निर्यातीवरही लक्ष ठेवले जाणार आहे. हे बदल करत असताना जुन्या यादीतील उत्पादनांना बाजूला न सारता त्यातच नवीन उत्पादनांची नावे जोडली गेली आहेत. कर्नाटक चित्रदुर्गचे एलईडी बल्ब आणि नाशिकची वाईन अशा उत्पादनांचा नवीन यादीत समावेश करण्यात आला आहे. पुलवामामध्ये विशेष उपलब्ध असणारे चिनार वृक्षांच्या लाकडापासून बनवलेल्या पेन्सिलींनीही नव्या यादीत नाव पटकावले आहे.
हे ही वाचा:
वसई-विरारमध्ये गुन्हेगारांचा उच्छाद; पोलिसांनी इतक्या जणांना घेतले ताब्यात
दिव्यांगांच्या डब्यात धडधाकटांची गर्दी
सावधान! कोरोनाची तिसरी लाट येतेय?
‘या’ शिवसेना खासदारावर ईडीचे छापे
नवीन उत्पादनांच्या यादीत विविधता असेल असा सरकारचा प्रयत्न असणार आहे. वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी या वर्षीसाठी ४०० अब्ज डॉलरची निर्यात होण्याचे लक्ष्य ठेवले आहे. ‘वन डिस्ट्रिक्ट, वन प्रॉडक्ट’ या उपक्रमाचे काम इनवेस्ट इंडिया द्वारे करण्यात येत आहे. आधीच्या यादीवर त्यांनी काम केलेले असून नवीन ७३९ जिल्ह्यांच्या उत्पादनासाठी ते काम करत आहेत. यादी बनवण्यासोबतच उत्पादनांची गुणवत्ता कशी वाढेल यावरही ते काम करत आहेत. भारतीय उत्पादकांना ई- कॉमर्स मंचावर आणण्यासाठीही प्रयत्न करत आहेत.