पंजाब नॅशनल बँकेला १४ हजार कोटी रुपयांचा गंडा घातलेला हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या मालमत्तेचा लिलाव होणार असून संबंधित आदेश कर्जवसुली लवादाने (Debt Recovery Tribunal-I) दिले आहेत. एचसीएल हाऊसचा लिलाव होणार असून या एचसीएल हाऊसची किंमत २ हजार १३३ कोटींपेक्षा जास्त आहे.
मरोळ येथील एचसीएल हाऊसचा लिलाव २३ सप्टेंबरला होणार असून किमान ५२ कोटींपासून पुढे याचा लिलाव सुरू होणार आहे. वसुली अधिकारी अजित त्रिपाठी यांनी ११ ऑगस्टला दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, संबंधित लिलावाची घोषणा ही आयकर अधिनयम, १९६१ च्या दुसऱ्या अनुसूचीमधील नियम ३८, ५१ (२) आणि बँक आणि वित्तीय संस्था, १९९३ या नुसार करण्यात आली आहे.
जानेवारी २०१८ मध्ये पंजाब नॅशनल बँकेच्या तक्रारीनंतर केंद्रीय तपास यंत्रणेने पहिला गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर ईडी, आयकर विभाग आणि इतर तपास यंत्रणांनी मोदी, मेहुल चोक्सी आणि बँकेचे अधिकारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
काही महिन्यांपूर्वी ईडीने नीरव मोदी समूह कंपन्यांच्या मालकीची २५३ कोटी ६२ लाख रुपये किंमतीची हाँगकाँगमधील मालमत्ता जप्त केली. या कारवाईनंतर नीरव मोदी याची एकूण २,६५० कोटी ७ लाख रुपयांची मालमत्ता जप्त झालेली आहे.
हे ही वाचा:
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनाही भर्ती व्हायचे होते लष्करात
कंबोज यांच्यानंतर आता निंबाळकरांचा ईडीस्फोट
दहीहंडी, गणेशोत्सवादरम्यान दाखल झालेले गुन्हे घेणार मागे
ती बोट इंजिन बंद पडल्याने भरकटली आणि हरिहरेश्वरला आली
नीरव मोदी याने पंजाब नॅशनल बँकेला १४ हजार कोटी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी ईडी ६,४९८ कोटी २० लाख रुपयांच्या घोटाळ्याचा तपास करत आहे, तर ७,५०२ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा तपास सीबीआय करत आहे.