केंद्र सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाने चार लेबर कोडच्या माध्यमातून कामगार कायद्यांशी संबधित नियमांना अंतिम स्वरुप दिलं आहे. हे नियम लवकरच लागू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या नव्या नियमांमुळे कामगार कायद्यात मोठा बदल करण्यात आला असून कामगार कायद्यात सुधारणा होणार असल्याची माहिती सरकारने दिली आहे. .
कामगारांचे वेतन, औद्योगिक संबंध, सामाजिक सुरक्षा आणि ऑक्यूपेशनल सेफ्टी, आरोग्य आणि कामाची स्थिती या चार लेबर कोडना राष्ट्रपतींची मंजूरी मिळाल्यानंतर त्याची अधिसूचना जारी करण्यात आली होती. परंतू, या चार कोडना लागू करण्यासाठी त्यासंबंधीच्या नियमांची अधिसूचना काढण्याची गरज आहे.
हे ही वाचा:
कामगार आणि रोजगार मंत्रालयाने या चार कोडच्या ड्राफ्टच्या आढाव्याला अंतिम स्वरुप दिले आहे. लवकरच त्यासंबंधी नोटिफिकेशन काढण्यात येणार आहे. कामगार मंत्रालयाच्या सचिव अपूर्वा चंद्र यांनी सांगितले आहे की, “या चार लेबर कोडची अंमलबजावणी करण्यासाठी नवीन नियम तयार करण्यात आले आहेत आणि सरकारने त्याला अंतिम स्वरुप दिले आहे. आता लवकरच त्याची अधिसूचना जारी करण्यात येईल.”
या नव्या कायद्यांमुळे कामगारांना ठराविक वेतन, कामकाजादरम्यान कामगारांच्या सुरक्षेसाठी पाळण्यात येणारे उपाय आणि कामकाजादरम्यान दुखापत झाल्यास उपचारांचा खर्च मिळणार आहे.