नव्या वर्षाच्या पहिल्या आठवड्यात भारतात ‘फ्लायबिग’ या नावाने विमान कंपनी सुरू होत आहे. ३ जानेवारीला या कंपनीचे पहिले विमान उड्डाण घेणार आहे. इंदौर येथून अहमदाबादसाठी दुपारी २.३० वाजता हे विमान उड्डाण करेल. या उड्डाणाचा कालावधी एक तास पाच मिनिटांचा असेल.
‘फ्लायबिग’ या विमान कंपनीची स्थापना संजय मांडविया यांनी केली आहे. ही विमान कंपनी सुरूवातीला आठवड्यातून तीन दिवस सेवा पुरवेल. फेब्रुवारीच्या मध्यापासून आठवड्यातून पाच दिवस ‘फ्लायबिग’ विमान कंपनीची विमाने उड्डाणाला सुरूवात करतील, असे कंपनीचे सी.ई.ओ श्रीनिवास राव यांनी मनीकंट्रोलशी बोलताना सांगितले.
येत्या काही महिन्यात ‘फ्लायबिग’ विमान कंपनी, इंदौर, रायपूर आणि भोपाळ ही द्वितीय श्रेणीतील शहरे या विमानसेवेने जोडली जाणार आहेत.
सध्या ‘फ्लायबिग’ कडे एक एटीआर विमान असून, दुसरे विमान लवकरच त्यांच्या ताफ्यात सामील होणार आहे.
पहिल्या उड्डाणासाठी दोन दिवसापासून आरक्षण सुरू करण्यात आले आहे. आतापर्यत २५ टक्के आरक्षण झाल्याची माहिती राव यांनी दिली आहे. ‘फ्लायबिग’ कंपनीने १५ हजार एजन्टसोबत करार केला आहे. यापैकी सर्वाधिक आरक्षण हे द्वितीय श्रेणीतील शहरातून झाले आहे.
सरत्या वर्षात वाढलेल्या प्रवासी संख्येच्या पार्श्वभूमीवर ‘फ्लायबिग’ कंपनीची स्थापना महत्त्वपूर्ण आहे. सरकारने ८० टक्क्यांपर्यंत प्रवासी वाहतूक करायला परवानगी दिल्यामुळे देशांतर्गत प्रवासी संख्येत वाढ झाली आहे.
डिसेंबर महिन्यातच डी.जी.सी.ए. कडून मान्यता प्राप्त झालेली ‘फ्लायबिग’ कंपनी लवकरच दिल्ली ते शिलॉंग मार्गावरही आपली सेवा सुरू करेल. ‘फ्लायबिग’ कंपनी लवकरच देशातील छोट्या शहरांना देखील आपल्या विमानसेवेने जोडणार आहे.