भारताची लस जगातील लोकांचे प्राण वाचवत आहे

भारताची लस जगातील लोकांचे प्राण वाचवत आहे

आज दावोस येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये संबोधित केले. यावेळी त्यांनी भारताने कोविड महामारीचा केलेला सामना आणि त्यातून सावरत असलेल्या अर्थव्यवस्थेवर भाष्य केले.

“मागील वर्षा फेब्रुवारी- मार्च मध्ये अनेकांना वाटले की भारत हा कोविड महामारीचा सर्वात मोठा बळी असेल. कोविड बाधितांची त्सुनामी येईल. अनेकांनी भारतात दोन मिलीयन बळी जातील असेही भाकित केले. परंतु लोकांच्या सहभागामुळे भारताने या आपत्तीचा सामना केला.” दावोस येथे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

“आज भारत त्या देशांमध्ये आहे, ज्यांना सर्वाधिक जीव वाचवण्यात यश आले आहे. जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी १८ टक्के लोकसंख्या असलेल्या देशाने परिस्थिती नियंत्रणात आणून जगाला मोठ्या आपत्तीपासून वाचवले आहे.”

यावेळी मोदींनी भारतात मोठ्या प्रमाणात चालू असलेल्या लसीकरण मोहिमेचा देखील उल्लेख केला. “केवळ १२ दिवसात भारताने तब्बल २.३ मिलीयन आरोग्य सेवकांना लसीकरण केले आहे.”

इतर देशांना केलेल्या मदतीचा उल्लेख करताना ते म्हणाले की, “इतर देशांना लस पुरवून भारताने जगभरातले जीव वाचवले आहेत. सध्या फक्त दोनच मेड-इन-इंडिया लसी उपलब्ध आहेत, लवकरच अधिक मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील.”

प्रश्नोत्तरांच्या वेळी मोदींनी जागतिक स्तरावरील सर्व सीईओंना आर्थिक आघाडीवरील परिस्थितीसुद्धा लवकरच पालटेल असा विश्वास दिला.

कोविड-१९ च्या काळातील अर्थव्यवस्थेबद्दल बोलताना ते म्हणाले, “कोविड काळातही आम्ही मूलभूत सुधारणांना गती दिली उत्पादकांना प्रोत्साहन देणाऱ्या योजना राबवल्या. महामारी असतानाही थेट विदेशी गुंतवणुकीचा दर २०२० मध्ये तेरा टक्के राहिला होता.”

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी जागतिक स्तरावरील सीईओंना उत्पादनाशी निगडीत योजनांच्या अंतर्गत भारतात गुंतवणुक करण्याचे निमंत्रण दिले.

Exit mobile version