एटीएम पडले मागे; लोक करत आहेत घरबसल्या व्यवहार

एटीएम पडले मागे; लोक करत आहेत घरबसल्या व्यवहार

काल (३ डिसेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इन्फिनिटी फोरमचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन केले. त्यावेळी उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते. यावेळी मोबाईलद्वारे होणाऱ्या व्यवहारांमध्ये वाढ झाल्याचे नरेंद्र मोदींनी सांगितले.

देशात गेल्या वर्षभरात एटीएममधून पैसे काढण्यापेक्षा मोबाईल पेमेंट्स व्यवहार वाढले आहेत. देशात हे असे पहिल्यांदाच घडले असून नागरिकांकडून आता कॅशलेस पेमेंटवर भर दिला जात असल्याचे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. सध्या बँकांचे व्यवहार पूर्णपणे डिजिटल स्वरूपात झाले आहेत. एका दशकापेक्षा कमी कालावधीत डिजिटल पेमेंट व्यवहार सामान्य होऊ शकतात, अशी आशा नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे.

चलनाचा इतिहास हा उत्क्रांती दर्शवतो. जसा मानव उत्क्रांत होत गेला, तसे त्याच्या व्यवहारांचे स्वरूपही विकसित होत गेले. आधी वस्तू विनिमय प्रणालीनंतर धातू, त्यानंतर नाण्यांपासून नोटांपर्यंत आणि आता धनादेश ते कार्डपर्यंत आपण येथे पोहोचलो आहोत, असेही पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.

देशात डिजिटल व्यवहारात वाढ झाली असून क्रेडिट- डेबिट कार्ड, नेट बँकिंग, गुगल पे, फोन पे, युपीआय याद्वारे डिजिटल व्यवहार वाढल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. ऑक्टोबर २०२१ मध्ये सुमारे ७.७१ लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० च्या नोटबंदी निर्णयाची घोषणा केल्यानंतर डिजिटल पेमेंट व्यवहारात वेगाने वाढ व्हायला सुरुवात झाली होती.

Exit mobile version