‘GOAT’ हे नाव संपूर्ण फुटबॉल जगताला माहिती आहे. GOAT (Greatest of All Time) म्हणून ज्याचं टोपण नाव आहे अश्या लियोनेल मेस्सीने परत एकदा आपल्या चाहत्यांना खुश केलं आहे आणि आपलं टोपण नाव खऱ्या अर्थाने परत एकदा सार्थ ठरवलं आहे. ‘बॅलन डी ओर २०२१’ (Ballon d ‘or 2021) या फुटबॉल विश्वातील सगळ्यात मानाच्या मानल्या जाणाऱ्या पुरस्काराचा मानकरी मेस्सी ठरला आहे. जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूला हा पुरस्कार देण्यात येतो आणि लियोनेल मेस्सीने हा पुरस्कार सात वेळा ( २००९, २०१०, २०११, २०१२, २०१५, २०१९ आणि २०२१) जिंकण्याचा नवीन विक्रम देखील केला आहे. २००९ ते २०१२, सलग ४ वर्षे हा पुरस्कार मेस्सीनेच जिंकला होता आणि तोही विक्रम त्याच्याच नावावर आहे.
का झाला मेस्सी ‘बॅलन डी ओर २०२१’ (Ballon d ‘or 2021) ?
ऑगस्ट २०२१ मध्ये मेस्सीने बार्सिलोना (Barcelona) क्लब सोडला आणि पीएसजी (PSG) क्लबमध्ये जाऊन आपल्या कारकिर्दीचा दुसरा हाल्फ सुरु केला. तत्पूर्वी त्याने एप्रिल २०२१ मध्ये बार्सिलोनाला ‘कोपा डेल रे’ (Copa Del Rey) ही स्पॅनिश फुटबॉल फेडरेशनची स्पर्धा जिंकवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली. या स्पर्धेत मेस्सीने ५ सामने खेळून ३ गोल केले आणि बार्सिलोना ही स्पर्धा जिंकला.
त्यानंतर जुलै २०२१ मध्ये झालेल्या कोपा अमेरिका (Copa America) ही स्पर्धा अर्जेंटिनाने जिंकली आणि यातही मेस्सीचे योगदान मोठे होते. ७ सामने खेळून यामध्ये मेस्सीने ५ गोल तर केलच शिवाय ४ असिस्टही केलं. त्याच बरोबर बेस्ट प्लेअर ऑफ कोपा अमेरिका हा पुरस्कारही त्याने जिंकला.
पीएसजी मधली मेस्सीची सुरवात ही चांगली झाली नाही परंतु पीएसजीसाठी खेळलेल्या ११ सामन्यांमध्ये ४ गोल आणि ३ असिस्टमुळे बॅलन डी ओर साठी लागणाऱ्या गुणसंख्येसाठी मेस्सीला मदत झाली.
कसा निवडला जातो बॅलन डी ओरचा मानकरी?
जगातील विविध देशांमधून १८० पत्रकार बॅलन डी ओर पुरस्कार निवड प्रक्रियेमध्ये ज्युरी म्हणून मूल्यांकनाचे काम करतात. फ्रान्स फुटबॉल समितीकडून जगातील सर्वोत्तम ३० फुटबॉल खेळाडूंची यादी या १८० पत्रकारांसमोर ठेवली जाते. मग प्रत्येक पत्रकार आपल्याबाजूने या ३० खेळाडूंमधून त्यांना सर्वोत्तम वाटणाऱ्या ५ खेळाडूंची निवड करतो. निवड केल्यावर प्रत्येक पत्रकाराला या ५ खेळाडूंना गुण द्यावे लागतात आणि हे गुण देताना ३ निकष समोर ठेवून गुणांकन केले जाते.
१. खेळाडूची एकूण कारकीर्द
२. खेळाडूची त्या वर्षातील कामगिरी
३. खेळाडूचे मैदानातील आणि मैदानाबाहेरील एकूण वर्तन
या ३ निकषांच्या आधारावर प्रत्येक पत्रकार खेळाडूला ६ ते १ या रेंजमध्ये गुण देतो (६ म्हणजे सर्वात चांगले आणि १ म्हणजे वाईट). मग या १८० पत्रकारांनी दिलेल्या गुणांची बेरीज करून ज्या खेळाडूला सर्वाधिक गुण असतात तो खेळाडू बॅलन डी ओरचा मानकरी ठरतो.
पॅरिस मध्ये पार पडलेल्या या सोहळ्याला जगातील आणि फुटबॉल विश्वातील अनेक मोठ्या व्यक्तींनी हजेरी लावली. लियोनेल मेस्सीसोबतच पोलिश फुटबॉलपटू आणि बायर्न म्युनिच क्लब कडून खेळणारा रॉबर्ट लेवान्डोस्की हा देखील बॅलन डी ओरच्या स्पर्धेत होता आणि अनेकांना तोच मानकरी व्हावा असे वाटत होते कारण २०२० च्या बॅलन डी ओर साठी सगळ्यांची मनं रॉबर्ट लेवान्डोस्कीने जिंकली होती परंतु कोरोनामुळे २०२० मध्ये हा पुरस्कार सोहळा रद्द करण्यात आला होता. पण खिलाडू वृत्ती दाखवत रॉबर्ट लेवान्डोस्कीने पुरस्कार सोहळ्यानंतर मेस्सी कौतुक केले आणि आपल्या ट्विट वरूनही त्याला शुभेच्छा दिल्या.
Congratulations Leo Messi and @alexiaputellas winners of the #BallonDor2021, congratulations also to all nominated players!👏 I won Striker of the Year Award and no Player can win an individual award without strongest team and loyal fans behind him. Thank you for your support🤜🤛 pic.twitter.com/I6j4BtluYS
— Robert Lewandowski (@lewy_official) November 29, 2021