क्रिकेट खेळताना बॉल डोक्याला लागून बेशुध्द पडल्यामुळे व्यावसायिक क्रिकेटर होण्याचे स्वप्न भंगले खरे, परंतु या अपघातातून जन्माला आला जगातील सर्वात श्रीमंत बँकर उदय कोटक, ज्यांना जग आज कोटक- महिंद्र बँकेचे सीईओ म्हणून ओळखते.
सध्या ६१ वर्षांचे असलेले उदय कोटक हे जगातील सर्वात श्रीमंत बँकर आहेत. वयाच्या विसाव्या वर्षी क्रिकेट खेळताना एक चेंडू डोक्याला लागून ते बेशुध्द झाले. त्यानंतर आपले व्यावसायिक क्रिकेट खेळण्याचे स्वप्न सोडून देऊन ते एमबीए कडे वळले. मुंबईच्या ‘जमनालाल बजाज इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट स्टडिज’ या नामांकित महाविद्यालयातून त्यांनी आपले एमबीएचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर १९८५ मध्ये आपल्या परिवाराकडून व मित्रांकडून $४१,००० कर्ज घेऊन ते वित्त क्षेत्रात ते उतरले. त्याच्या पुढच्याच वर्षी प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांच्या सोबत भागीदारी करून त्यांनी व्यवसायाचा विस्तार केला. आर्थिक क्षेत्रातील विविध टप्पे पार करत २००३ मध्ये बँकर म्हणून त्यांना आरबीआयचा परवाना मिळाला आणि आज ते एक बँकर म्हणून ते प्रस्थापित झाले आहेत.
भारताच्या इतर पारिवारिक व्यवसायिकांसारखे आपल्याच परिवारातील लोकांना डायरेक्टर बोर्डवर न घेता तज्ज्ञांना प्राधान्य दिले. हे धोरण गुंतवणुकीसाठी उपयुक्त ठरले. उत्तम आर्थिक नियोजन, कमी धोका असलेल्या क्षेत्रात कर्ज देण्याचे धोरण आदी कारणांमुळे कोटक महिंद्रा बँक विश्वसनीय राहिली आहे. त्यामुळे आर्थिक अडचणींच्या काळात देखील कोटक महिंद्रावरील गुंतवणुकदारांचा विश्वास कायम राहिल्याचे चित्र आजवर पहायला मिळाले आहे.