संयुक्त राष्ट्राच्या व्यापार आणि विकास परिषदेने बुधवारी ‘जागतिक गुंतवणूक अहवाल २०२३’जाहीर केला आहे. त्यात गेल्या वर्षी जगभरातील विकसित देशांमधील थेट परदेशी गुंतवणुकीत (एफडीआय) ३७ टक्के घट झाली. तर, भारतातील परदेशी गुंतवणुकीत १० टक्के वाढ झाल्याचे नमूद केले आहे. सन २०२२मध्ये विकसित देशांमध्ये एकूण ३७८ अब्ज डॉलर थेट परदेशी गुंतवणूक झाली. तर, भारतामध्ये ४९ अब्ज डॉलर गुंतवणूक झाली आहे.
आशिया खंडातील विकसनशील देशांमध्ये सन २०२१प्रमाणेच ६६२ अब्ज डॉलर थेट विदेशी गुंतवणूक झाली आहे. हा निधी जागतिकस्तरावर झालेल्या एकूण थेट विदेशी गुंतवणुकीच्या निम्मा आहे. गेल्या वर्षी ज्या पाच देशांमध्ये सर्वाधिक ८० टक्के थेट गुंतवणूक झाली होती, त्यात भारत, चीन, सिंगापूर, हाँगकॉँग आणि संयुक्त अरब अमिरात देशांचा समावेश होता.
चीनमधील थेट विदेशी गुंतवणूक पाच टक्के वाढून १८९ अब्ज डॉलर पोहोचली होती. तर, हाँगकॉँगमधील थेट विदेशी गुंतवणूक १६ टक्के घटून ११८ अब्ज डॉलर झाली आहे. भारत वेगाने प्रगतिपथावर मार्गक्रमण करत असल्याने एफडीआयमध्ये वाढ होत असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फ्रान्स दौरा असेल एक दुर्मिळ सन्मान
मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी ‘त्या’ अपमानित कष्टकऱ्याचे पाय धुतले!
सुप्रिया सुळेंचे भाषण म्हणजे निबंध
वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा
जगभरातील एकूण एफडीआयमध्ये १२ टक्के घट
अहवालानुसार, गेल्या वर्षी जगभरातील थेट विदेशी गुंतवणुकीत १२ टक्के घट झाली आहे. गेल्या वर्षी केवळ १.३ लाख कोटी डॉलरच गुंतवणूक होऊ शकली. युक्रेन युद्ध, खाण्यापिण्याच्या वस्तू तसेच ऊर्जेच्या किमतीची दरवाढ आणि सार्वजनिक कर्जांमध्ये वाढ यामुळे ही घट झाल्याचे मानले जात आहे. सिंगापूरमध्ये सर्वाधिक १४१ अब्ज डॉलर थेट विदेशी गुंतवणूक झाली आहे. ही सन २०२१च्या तुलनेत आठ टक्क्यांहून अधिक आहे. तर, व्हिएतनाममधील एफडीआयमध्ये तब्बल ३९ टक्के वाढ होऊन ती १७ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली आहे.