इन्फोसिसची छप्परफाड कमाई!

इन्फोसिसची छप्परफाड कमाई!

कोरोना महामारीत जगाच आर्थिक गणित बिघडलं, लॉकडाऊन मुळे अनेक व्यावसायिकांना बराच तोटा सहन करावा लागला आहे. मात्र याच  लॉकडाऊनचा फायदा झाला तो आयटी क्षेत्राला. कोरोना काळानंतरही आयटी कंपन्यांच्या महसुलाचा आलेख हा वाढताच राहिलाय. सध्या विविध कंपन्यांचे गेल्या आर्थिक वर्षाचे शेवटच्या तिमाहीचे अहवाल समोर आले आहेत. देशातील सर्वात मोठ्या दुसऱ्या क्रमांकाची सॉफ्टवेअर कंपनी इन्फोसिसचा चौथ्या तिमाहीचा अहवाल समोर आला आहे.

इन्फोसिसचा तिमाहीचा अहवाल 

इन्फोसिसने चौथ्या तिमाहीत चांगली कामगिरी करत ५ हजार ६८६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. मात्र गेल्या तिमाहीच्या तुलनेत मार्च तिमाहीत इन्फोसिसच्या निव्वळ नफ्यात २ टक्क्यांची घसरणच झाली आहे. गेल्या तिमाहीत कंपनीने ५ हजार ८०९ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. परंतु, वार्षिक आधारावर कंपनीच्या नफ्यात १२ टक्क्यांची वाढ झाली आहे. तसेच या तिमाहीत इन्फोसिसचा महसूल २२ पूर्णांक 7 टक्क्यांनी वाढून 32 हजार 276 कोटी रुपयांवर पोहोचला आह. जो मागील वर्षीच्या याच कालावधीत 26 हजार 311 कोटी रुपये होता. त्यामुळे या तिमाहीत ५ हजार ९६५ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत कंपनीचा महसूल २१ टक्क्यांनी वाढून १ लाख २१ हजार ६४१ कोटी रुपयांवर पोहचला आहे. मात्र, जगात टॉप तीन मध्ये असलेल्या या इन्फोसिसमध्ये कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे. गेल्या तीन महिन्यात जवळपास ८० हजार कर्मचाऱ्यांनी इन्फोसिस कंपनी सोडली आहे.

एवढ्या संख्यने इन्फोसिसचे कर्मचारी का घटले?

इन्फोसिसने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन महिन्यांत कंपनीतून 27 पूर्णांक 7 टक्के कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडली आहे. हा आकडा गेल्या १२ महिन्यांत नोकरी सोडून जाणाऱ्यांपेक्षा खूप जास्त असून तिसऱ्या तिमाहीत २० टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांनी कंपनी सोडली आहे. अचानक एवढे कर्मचारी नोकरी सोडून जाण्याचं कारण म्हणजे, आयटी कंपन्यांमध्ये कौशल्यपूर्ण कर्मचारी फोडण्याचा प्रकार नेहमी सुरुच असतो आणि इन्फोसिसला देशातील कौशल्यपूर्ण लोकांची खाण म्हणतात. अशावेळी इतर कंपन्यांकडून जास्त पगार ऑफर केला जातो. त्यासोबत पोस्टही वाढविली जाते आणि मग कर्मचारी त्यांना सोयीचं वाटेल तिथे जातात.

हे ही वाचा:

INFOSYS ची छप्परफाड कमाई

गोलमालमधील ‘रत्ना’ काळाच्या पडद्याआड

शरद पवार भाषण करताना व्यक्ती पोहोचला मंचावर

रशियासमोर आता आणखी दोन ‘युक्रेन’!

अनेक कर्मचारी कंपनी सोडून जात असताना इन्फोसिसने मात्र रशियातून आपला व्यवसाय गुंडाळण्यास सुरवात केली आहे. रशिया युक्रेन युद्धामुळे इन्फोसिसने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. सध्या रशियामध्ये असलेल्या कार्यालयाचे स्थलांतर इतर देशात करण्यास सुरुवात झाली आहे. रशियामध्ये तसा इन्फोसिसचा फार मोठा कारभार नसून या कंपनीत रशियाचे फक्त शंभर कर्मचारी आहेत. इथून पुढे रशियाच्या कोणत्याही ग्राहकासोबत इन्फोसिस काम करणार नसल्याचे इन्फोसिसचे सिएओ सलिल पारेख यांनी सांगितल आहे. जगात आयटी कंपन्यांसाठी, यूएस, यूके आणि युरोप ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे आणि आयटी कंपन्या पूर्व युरोपमध्ये त्यांची उपस्थिती वाढवण्याचा पूर्ण प्रयत्नात आहेत.

इन्फोसिसचा प्रवास 

४१ वर्षात सुमारे ५० पेक्षा जास्त देशांमध्ये इन्फोसिसचे जाळं विस्तारले आहे. १९८१ साली पुण्यामध्ये एन. आर नारायण मूर्ती यांनी सहकार्यासह ही कंपनी सुरु केली. नारायण मूर्ती आणि त्यांचे सहकारी पहिले पटनी कॉम्पुटर सिस्टीमचे कर्मचारी होते. १९७५ पासून जगात सोफ्टवेअरची  मागणी वाढू लागली आणि ह्याच संधीचा फायदा घेत त्यांनी इन्फोसिस कंपनी सुरु करण्याचा निर्णय घेतला. फक्त दहा हजारात सुरु झालेल्या या कंपनीचा सध्या १३ अब्ज डॉलरची उलाढाल आहे. सध्या इन्फोसिसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या ३ लाखांच्या घरात असून ३९ टक्के ह्या महिला कर्मचारी आहेत.

Exit mobile version