आर्थिक आघाडीवर केंद्र सरकारला दुहेरी दिलासा मिळाला आहे. देशातील महागाई १५ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आल्यानंतर आता अर्थव्यवस्थेचे चक्र पुन्हा गतिमान झाले आहे. ऊर्जा, खाण आणि उत्पादन या क्षेत्रांच्या चमकदार काम गिरीमुळे देशाच्या औद्योगिक उत्पादनात वाढ झाली आहे. देशातील औद्योगिक उत्पादन निर्देशांकात फेब्रुवारी महिन्यात ५.६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात औद्योगिक उत्पादनात १.२ टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीमध्ये म्हटले आहे.
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने १२ एप्रिल रोजी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, औद्योगिक उत्पादन निर्देशांकावर आधारित औद्योगिक उत्पादन फेब्रुवारी महिन्यात ५.६टक्क्यांनी वाढले आहे.या वर्षी जानेवारी महिन्यात औद्योगिक उत्पादन ५.५ टक्के होते. फेब्रुवारीमध्ये उत्पादन क्षेत्राचे उत्पादन ५.३ टक्के नोंद झाले आहे. वर्षभरापूर्वी त्यात ०.२ टक्क्यांनी वाढ झाली होती. त्याच वेळी, खाण क्षेत्राचे उत्पादन ४.६ टक्क्यांवर स्थिर राहिले. वीज निर्मितीच्या बाबतीत हा विकास दर आणखी चांगला ८.२ टक्के राहिला आहे. हे सूचित करते की देशात औद्योगिक घडामोडींना गती मिळत आहे, कारण विजेचा वापर वाढत आहे.
विकास दरात ७ टक्के वाढीचा अंदाज
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने २८ फेब्रुवारी २०२३ अर्थव्यवस्थेबाबत दुसरा आगाऊ अंदाज जाहीर केला होता. त्यानुसार २०२२-२३ मध्ये भारताच्या देशाच्या विकास दरात ७ टक्के दराने वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. रिझर्व्ह बँकेने अलीकडेच २०२३-२४ या आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक विकास दर ६.५ टक्के असू शकतो असा अंदाजच व्यक्त केला होता.
किरकोळ महागाईनेही दिलासा दिला
औद्योगिक उत्पादनाची आकडेवारी जाहीर होण्याच्या आधी किरकोळ महागाईचे आकडेही जाहीर झाले होते. अधिकृत आकडेवारीनुसार, मार्च महिन्यात किरकोळ महागाईत आणखी घट नोंदवली गेली. मार्च महिन्यात किरकोळ महागाईचा दर ५.६६ टक्क्यांवर आला आहे. अशाप्रकारे किरकोळ महागाई पुन्हा एकदा रिझर्व्ह बँकेच्या कक्षेत आली आहे. यापूर्वी फेब्रुवारीमध्ये किरकोळ महागाई दर ६.४४ टक्के होता.