अमेरिकेत महागाईचा दर वाढल्याने फेडरल रिजर्व्ह बँक ही व्याजदरात वाढ करणार असल्याचे अनेक दिवसांपासून सांगितले जात होते. अमेरिकेच्या महागाई दराचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम होत होता. मात्र अमेरिकेने व्याज दरात वाढ केल्यांनतरही भारतीय शेअर बाजारात आज तेजी दिसून आली आहे. आज सेन्सेक्स ५०० अंकांनी वधारला आहे. शेअर बाजारातील मोठ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी दिसल्याने सेन्सेक्स आणि निफ्टी वधारले.
अनेक दिवसांपासून भारतीय शेअर बाजार कोसळत होता. त्यांनतर अनेक दिवसांनी गुरुवार, १६ जून रोजी म्हणजेच आज शेअर बाजाराची दिवसाची सुरुवात चांगली झाली आहे. आज शेअर बाजारातील व्यवहाराला सुरुवात होताच, बीएसईचा निर्देशांक सेन्सेक्सने ५३ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. सेन्सेक्सची सुरुवात जवळपास ४७७ अंकांच्या उसळणीसह झाली. तर एनएसई निर्देशांक निफ्टी १४०.१० अंकांनी वधारत १५ हजार ८३२ अंकांवर खुला झाला आहे.
अनके दिवसांनी निफ्टीतील सर्व क्षेत्रातील इंडेक्स तेजीत आहेत. सर्वात जास्त मीडियाचा इंडेक्स वधारला आहे. तर, पीएसयू बँक शेअर दरात १.११ टक्क्यांनी वधारला आहे. रिअल्टी, मेटल, ऑटो आणि वित्तीय सेवा आदींच्या शेअर्समध्ये आज तेजी असल्याचे दिसत आहे.
हे ही वाचा:
‘मलिकांचं मंत्रीपद रद्द करा’ सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल
देशातील पहिली खासगी रेल्वे शिर्डीत दाखल
सोलोमन बेटांवरून चीनची नजर ऑस्ट्रेलियावर!
दरम्यान, अमेरिकेतील वाढती महागाई लक्षात घेऊन फेडरल रिझर्व्हने व्याजदरात वाढ केली आहे. बुधवार,१५ जून रोजी फेडरल रिझर्व्हने व्याजदर ७५ बेस पॉईंट्सनी वाढवला आहे. अमेरिकेत व्याजदर वाढल्यांनंतर शेअर बाजारात आणखी मंदी येईल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र आज शेअर बाजार उगडताच सेन्सेक्स आणि निफ्टी मध्ये वाढ झाली आहे.