भारतीय शेअर बाजार सध्या जबरदस्त तेजीमध्ये आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी हे शेअर बाजाराचे दोन्ही निर्देशांक विक्रमी पातळीवर पोचले आहेत. आज सेन्सेक्सने ५९,००० अशांचा टप्पा ओलांडला आहे. बाजारातील जाणकारांच्या मतानुसार लवकरच सेन्सेक्स ६०,००० अंशांचा टप्पादेखील ओलांडण्याची चिन्हे आहेत. बाजारातील या विक्रमी तेजीमुळे भारतीय शेअर बाजार फ्रान्सच्या शेअर बाजाराला मागे टाकत जगातील सहावा सर्वात मोठा शेअर बाजार बनला आहे. बाजारातील भागभांडवल किंवा मार्केट कॅपिटलच्या दृष्टीने भारतीय शेअर बाजाराने ३.४० ट्रिलियन डॉलरचा टप्पा ओलांडला आहे.
ब्लूमबर्गमधील वृत्तानुसार मार्केट कॅपिटल म्हणजे बाजारमूल्यानुसार अमेरिकन शेअर बाजार जगात नंबर वन आहे. वॉल स्ट्रीट या अमेरिकन शेअर बाजाराचे एकूण बाजारमूल्य ५१.३ ट्रिलियन डॉलर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर चीन आहे. चीनच्या शेअर बाजाराचे एकूण भागभांडवल १२.४२ ट्रिलियन डॉलर आहे. जपानचा शेअर बाजार ७.४३ ट्रिलियन डॉलरच्या एकूण भागभांडवलानिशी तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर हॉंगकॉंगचा शेअर बाजार चौथ्या क्रमांकावर असून त्याचे बाजारमूल्य ६.५२ ट्रिलियन डॉलर आहे. त्यानंतर इंग्लंडचा शेअर बाजार पाचव्या क्रमांकावर असून त्याचे एकूण बाजारमूल्य ३.६८ ट्रिलियन डॉलर इतके आहे. तर भारतीय शेअर बाजार ३.४१ ट्रिलियन डॉलरच्या एकूण भागभांडवलानिशी सहाव्या क्रमांकावर आहे. ३.४० ट्रिलियन डॉलरच्या बाजारमूल्यानिशी फ्रान्स आता सातव्या क्रमांकावर गेला आहे.
हे ही वाचा:
पाकिस्तानमध्ये सामना सुरु होण्यापूर्वी मालिकाच रद्द
अफगाणिस्तानात ‘घटना’ कट्टरतेची जाणीव करून देणारी
विराट कोहलीने केले होते रोहित शर्माला डावलण्याचे प्रयत्न
धक्कादायक: दहा डीसीपींकडून गोळा केले ४० कोटी रुपये
भारतीय शेअर बाजारने यावर्षी आतापर्यतची सर्वाधिक तेजी आणि वाढ नोंदवली आहे. मार्च २०२० ला गडगडलेल्या शेअर बाजाराने मोठीच झेप घेतली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीने अनुक्रमे २३ आणि २५ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. परकी आणि देशांतर्गत गुंतवणुकदारांनी एकत्रितरित्या जवळपास ८ अब्ज डॉलर मूल्याच्या शेअरची खरेदी केली आहे. यावर्षी भारतीय शेअर बाजारात ८७४ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. ३१ डिसेंबर २०२०ला भारतीय शेअर बाजार २.५२ अब्ज डॉलरवर होता. त्यात ३५ टक्क्यांची वाढ होत तो आता ३.४१ टप्पा पार करून पुढे गेला आहे.