भारतीय रेल्वे बुकिंग झाले ‘सुपरफास्ट’

भारतीय रेल्वे बुकिंग झाले ‘सुपरफास्ट’

३१ डिसेंबर रोजी रेल्वेने आपली तिकीट बुकिंग वेबसाईट नव्या रूपात समोर आणली आहे. रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी या नव्या संकेतस्थळाचे अनावरण केले. ‘आयआरसीटीसी’ ची हे नवे रूप अधिक प्रगत, वापरायला सुलभ आणि वेगवान असणार आहे. तसेच खोट्या दलालांना आळा घालण्यासाठीही काही खास ‘फीचर्स’ या साईटवर असणार आहेत. ‘आयआरसीटी’ साईट सोबतच एप्लिकेशनचेही अधिक ‘प्रगत’ होणार आहे.

नव्या ‘आयआरसीटीसी’ वेबसाईटवर तिकिट बुकिंग प्रक्रिया सोपी आणि अधिक जलद आहे. या साईटवरून मिनिटाला दहा हजारपेक्षा अधिक तिकिटांचे बुकिंग होऊ शकते. यापूर्वी हा आकडा मिनिटाला साडेसात हजार तिकिटे इतका होता. तिकीट बुकिंगसाठी साईटवर गर्दी झाली तरी साईट बंद पडणार नाही यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. या साईट वर तिकिटासोबतच प्रवासातील जेवण मागवायची सोयही आहे.

‘आयआरसीटीसी’ ची नवी ‘पोस्टपेड’ सुविधाही उपलब्ध

नव्या वेबसाईटवर नागरिकांना ‘बुक नाऊ पे लेटर’ चा पर्याय देण्यात आला आहे. या पर्यायाचा लाभ घेताना नागरिक तिकिट बुक करून काही कालावधी नंतर तिकीटाची रक्कम भरू शकतात. यासाठी नागरिकांना १५ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. तिकीट बुक केल्यानंतर १५ दिवसांत ई-पेमेंट द्वारे नागरिकांना तिकीटाची रक्कम भरता येऊ शकते. जाहिरातदारांसाठीही ‘आयआरसीटीसी’ ने खास सोय केली आहे. जुन्या साईटच्या तुलनेत नव्या वेबसाईटवर जास्त जाहिराती असणार आहेत ज्यामुळे भारतीय रेल्वेच्या उत्पन्नात वाढ होणार आहे.

भारतीय रेल्वे खात्याच्या म्हणण्यानुसार २०१४ नंतर रेल्वेने तिकीट बुकिंगसोबतच प्रवाशांना जास्त चांगल्या सुविधा प्रदान करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘आयआरसीटीसी’ वेबसाईटच्या माध्यमातून रेल्वे प्रवास अधिक सुलभ करण्याचा रेल्वेचा हेतू आहे.

Exit mobile version