मूळ भारतीय वंशाची नीती तज्ज्ञ निशा देसाई बिस्वाल यांची आंतरराष्ट्रीय विकास वित्त निगम (डीएफसी) या अमेरिकी वित्त संस्थेच्या डेप्युटी सीईओपदी नियुक्ती झाली आहे. अमेरिकेच्या सिनेटने या पदासाठी त्यांच्या नामांकनाला मंजुरी दिली होती. सिनेटने २७ जुलै रोजी सर्वसंमतीने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते. त्यानंतर १४ ऑगस्ट रोजी डीएफसीचे सीईओ स्कॉट नाथन यांनी त्यांना शपथ दिली. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी या पदासाठी मार्चच्या सुरुवातीलाच त्यांच्या नावाची घोषणा केली होती.
निशा बिस्वाल या सध्या अमेरिकेच्या चेंबर ऑफ कॉमर्समध्ये आंतरराष्ट्रीय रणनिती विभागाच्या वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत. अमेरिका-भारत व्यापार परिषद आणि अमेरिका-बांग्लादेश व्यापार परिषद यांच्यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे.
हे ही वाचा:
आपला महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर
अमेरिकेचे विमान तीन मिनिटांत १५ हजार फूट खाली; प्रवाशांची भीतीने गाळण
देशाच्या विकासात महिलांचे मोठे योगदान, त्यांच्या सक्षमीकरणाची गरज
चीन-पाकिस्तानवर नजर ठेवणार भारताचे हेरॉन मार्क २ ड्रोन
त्यांना अमेरिकी काँग्रेस आणि खासगी क्षेत्रात अमेरिकी परदेशी निती आणि आंतरराष्ट्रीय विकास कार्यक्रमांमध्ये ३० हून अधिक वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी सन २०१३ ते २०१७ या कालावधीत अमेरिकी विदेशी विभागात दक्षिण आणि मध्य आशियाई विभागात सहायक सचिव म्हणून काम पाहिले आहे. या काळात त्यांनी अमेरिका-भारत राजनैतिक भागिदारीची जबाबदारी पाहिली होती.
‘डीएफसीच्या पहिल्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी निशा बिस्वाल यांचे स्वागत करण्यासाठी डीएफसीची टीम खूप उत्सुक आहे. त्यांना सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रात विदेश नीतीचा व्यापक अनुभव आहे. हा अनुभव डीएफसीला फायदेशीर ठरेल,’ अशी आशा डीएफसीचे सीईओ स्कॉर्ट नाथन यांनी व्यक्त केली.