गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाशी सामना करत असलेल्या भारताच्या अर्थव्यवस्थेचे चाक रुळावरून घसरले होते. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा तडाखा भारतीय अर्थव्यवस्थेला पहिल्या एप्रिल जूनच्या पहिल्या तिमाहीमध्येच बसला होता. २०२०- २१ च्या पहिल्या तिमाहीत कोरोना संकटामुळे आर्थिक विकासाचा दर उणे २४.४ टक्के इतका खाली उतरला होता. मात्र ही निराशा झटकून अर्थव्यवस्थेने २१.१ टक्क्याची झेप घेतली आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत अर्थव्यवस्थेची वाढ २१.४ टक्के दराने होईल, असा अंदाज भारतीय रिझर्व्ह बँकेने वर्तविला होता. संपूर्ण वित्तीय वर्षासाठी रिझर्व्ह बँकेने अर्थव्यवस्थेच्या विकास दराचे भाकित १०.५ टक्क्यांऐवजी ९.५ टक्क्यांपर्यंत खाली आणले आहे. जागतिक बँकेने भारताच्या आर्थिक विकासाच्या दरात ८.३ टक्क्यांनी वाढ होईल, असा अंदाज वर्तविला आहे. मात्र पहिल्या तिमाहीत आर्थिक विकास दर २१.१ टक्क्यांनी वाढला याचा अर्थ अर्थव्यवस्थेत वेगाने सुधारणा होत आहे, असा काढला जाऊ नये असे अर्थतज्ज्ञांचे मत आहे.
हे ही वाचा:
‘हे तुमच्यासाठी…’ खास व्यक्तीसाठी रोनाल्डोने लिहिली भावनिक पोस्ट
टेस्लाची ‘ही’ चार मॉडेल्स भारतात
केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाने मंगळवारी ही माहिती जाहीर केली. गेल्यावर्षी कोरोना संकटामुळे देशव्यापी लॉकडाऊन लावल्यामुळे अर्थव्यवस्था एप्रिल- जून २०२० मध्ये २६.९५ लाख कोटी रुपयांनी घसरली होती. कोरोनाच्या संकटामुळे मागच्या २०२०- २१ या वित्तीय वर्षात पहिल्या तिमाहीमध्ये उणे २४.४ टक्के, दुसऱ्या तिमाहीत उणे ७.५ टक्के, तिसऱ्या तिमाहीमध्ये ०.४ टक्के आणि चौथ्या तिमाहीमध्ये १.६ टक्के अशा विकास दरांची नोंद झाली होती. २०२०– २१ या आर्थिक वर्षात सरासरी उणे ७.३ टक्क्यांनी अर्थव्यवस्था खालावली होती. त्याआधीच्या २०१९- २० या वित्तीय वर्षात भारताची अर्थव्यवस्था ३.१ टक्क्यांनी वाढली होती. चालू वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीचे आर्थिक विकास दराचे आकडे येत्या ३१ नोव्हेंबर रोजी जाहीर होतील, अशी माहिती सांख्यिकी मंत्रालयाने सांगितली.
कोरोनामुळे लागू केलेले नियम आता हळूहळू शिथिल होत असल्यामुळे देशाच्या आर्थिक विकासाला गती प्राप्त होत आहे, असे निरीक्षण मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसने नोंदवले आहे. ग्लोबल मॅक्रो आऊटलूक २०२१- २२ या अहवालात मूडीजने चालू वर्षासाठी देशाचा विकासदर ९.६ टक्के, तर २०२२ साठी ७ टक्के असेल असे म्हटले आहे.