पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ जानेवारी २०२० रोजी कोची-मंगळूरू गॅस पाईपलाईनचे लोकार्पण करणार आहेत. हे लोकार्पण व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे करण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता हा समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
कर्नाटक आणि केरळ राज्यांचे गव्हर्नर आणि दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. त्याबरोबरच केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री या प्रसंगी उपस्थित असतील.
सुमारे ४५० कि.मी लांबीची ही पाईपलाईन गेल (इंडिया) तर्फे बांधण्यात आली आहे. या पाईपलाईनची क्षमता १२ दशलक्ष घन मीटर इतकी असून ही पाईपलाईन लिक्विफाईड नैसर्गिक वायू वाहून नेण्यास सक्षम आहे. कोची आणि मंगळूरू येथे या पाईपलाईनचे अंतिम बिंदू असतील जिथे द्रवरूप वायूचे पुन्हा वायूरुप होऊ शकेल. कोची ते मंगळूरू या टप्प्यात ही पाईपलाईन एर्नाकुलम्, थ्रिसूर, पलक्कड, मल्लपुरम्, कोझिकोडे, कन्नुर आणि कसरागोड या केरळच्या जिल्ह्यांतून जाणार आहे.
या प्रकल्पाचा एकूण खर्च ₹३,००० कोटी रुपये आला आहे. या पाईपलाईनच्या निर्मीतीसाठी १२ लाख मानवी दिवसांचा कालावधी लागला होता. पाईपलाईनच्या बांधकामासाठी अनेक अडथळ्यांना तोंड द्यावे लागले. ही पाईपलाईन १०० पेक्षा जास्त ठिकाणी पाणवठ्यांखालून जाते. त्यासाठी उच्च दर्जाच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या पाईपलाईनमुळे पर्यावरणप्रेमी इंधन घरगुती तसेच औद्योगिक वापरासाठी उपलब्ध होईल. यामुळे वायु प्रदुषणात घट होण्या मदत होईल असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
(बिझनेस लाईनमधून साभार)