२०५० पर्यंत सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारत उदयास येणार

आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर मायकेल देबब्रत पात्रा यांचा विश्वास

२०५० पर्यंत सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारत उदयास येणार

भारत पुढील दशकात १० टक्के विकास दर गाठू शकेल असा विश्वास भारतीय रिझर्व्ह बँकेचे म्हणजेच आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर मायकेल देबब्रत पात्रा यांनी व्यक्त केला आहे. जपानमधील क्योटो येथे ४० व्या सेंट्रल बँकर्स सेमिनारमध्ये भारतीय अर्थव्यवस्था: संधी आणि आव्हाने या विषयावर मुख्य भाषण देत असताना त्यांनी त्यांचे मत मांडले आहे.

भारत गेल्या काही वर्षांपासून सुरू झालेल्या बदलांच्या माध्यमातून आव्हानांवर मात करत आहे. त्यामुळे हे असेच चालू राहिल्यास भारत २०३२ पर्यंत जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. शिवाय २०५० पर्यंत सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारत उदयास येईल, असे खात्रीलायक विधान पात्रा यांनी केले आहे. भारताच्या अलीकडच्या अर्थिक वृद्धीच्या कामगिरीने अनेकांना आश्चर्यचकित केले आहे, असेही ते म्हणाले.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच आयएमएफची अशी अपेक्षा आहे की, भारताने जागतिक वाढीमध्ये १६ टक्के योगदान द्यावे. हे योगदान म्हणजे बाजार विनिमय दरांच्या बाबतीत जगातील दुसरा सर्वात मोठा वाटा आहे. यानुसार, भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे आणि येत्या दशकात जर्मनी आणि जपानला मागे टाकण्याच्या तयारीत भारत आहे. परचेसिंग पॉवर पॅरिटी (PPP) अटींमध्ये भारतीय अर्थव्यवस्था आधीच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे, असे मायकेल देबब्रत पात्रा यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

वकिलांच्या पत्रानंतर पंतप्रधान मोदी यांची काँग्रेस नेत्यांवर टीका

बेंगळुरूतील कॅफे स्फोटातील मुख्य संशयिताला अटक

गँगस्टर मुख्तार अन्सारीचा मृत्यू

न्यायपालिकेवर टीका करणाऱ्यांविरोधात ६०० वकिलांनी सरन्यायाधीशांना लिहिले पत्र

मायकेल देबब्रत पात्रा असेही पुढे म्हणाले की, आव्हानांचा सामना यशस्वी करत भारत २०४५ पर्यंत नव्हे तर २०३२ पर्यंत जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल आणि २०५० पर्यंत सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. भारताला २०४७ पर्यंत ३५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था होण्यासाठी ९ते १० टक्के विकास दर गाठण्याची गरज आहे. भारताची अर्थव्यवस्था ऑक्टोबर-डिसेंबर २०२३ मध्ये अपेक्षेपेक्षा जास्त म्हणजेच ८.४ टक्के दराने वाढली, जी गेल्या दीड वर्षातील सर्वोच्च पातळी आहे.

Exit mobile version