प्रसिद्ध नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ पॉल क्रुगमन यांनी भारत सरकारला एक मोलाचा सल्ला दिला आहे. भारताने ‘लायसन्स राज’च्या काळाकडे पुन्हा जाऊ नये, उलट भारतीय अर्थव्यवस्था खुली करण्यावर भर द्यावा असा सल्ला त्यांनी दिला आहे. भारतातील अशोका विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना क्रुगमन यांनी हे विधान केले.
१९९१ पूर्वी भारतात ‘लायसन्स राज’ व्यवस्था होती. या व्यवस्थेवर जगभरातून टीकाही केली जात होती. भारतातील अनेक तज्ज्ञांनी देखील या विषयी भाष्य केले होते. परंतु शेवटी १९९१ मध्ये जेंव्हा भारतावर सोनं विकण्याची वेळ आली, तेंव्हा भारताला उदारीकरण करावे लागले होते. लायसन्स राज म्हणजे कोणत्याही खासगी उद्योगासाठी सरकारकडून परवाना म्हणजेच लायसन्स आवश्यक असणे. अशा प्रकारे भारतात १९९१ पूर्वी उद्योगधंदे सुरु होते. यामुळेच भारताची आर्थिक स्थिती डबघाईला गेली होती.
हे ही वाचा:
परकीय चलन साठ्यांत भारताने रशियाला मागे टाकले
भारतातील हवाई क्षेत्राचे नवे ‘चौथे उडान’
‘या’ सहा बँकांचे खासगीकरण तूर्तास नाही
नाणारला तळा अथवा जयगडचा पर्याय
याच विषावर बोलताना, भारताने पुन्हा लायसन्स राजच्या काळात जाऊ नये. असे क्रुगमन यांनी सांगितले. “भारतीय उद्योगांना आंतरराष्टीय स्पर्धांपासून वाचवण्यासाठी लायसन्स राजकडे जाण्याचा विचार येणे साहजिक आहे, परंतु स्पर्धेतूनच भारतीय उद्योगांची क्षमता वाढेल आणि भारतीय उद्योग जागतिक स्तरावर स्पर्धा करू शकतील.” असे क्रुगमन म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतेच एक विधान केले होते, “सरकारने व्यवसायांमध्ये, उद्योगांमध्ये सहभागी होऊ नये.” यावरून भारत सरकारचीही नीती लायसन्स राजच्या विरोधातील असल्याचेच स्पष्ट होत आहे. भारत सरकारने आणलेल्या नवीन कृषी विषयक कायद्यांमुळेही हेच स्पष्ट होत आहे.